
चोर कुठे चोरी करतील याची काही नेम नाही. मग ते बंद असलेलं दुकान असो की घर. बँका आणि एटीएम सेंटर तर त्यांच्या रडारवर असतातच. शिवाय हे चोर मालदार पार्टी बघूनच बऱ्याच वेळा चोरी करतात. त्यासाठी रेकी वैगरे या गोष्टी आल्याच. असाच एक प्रकार धुळ्यात समोर आला आहे. इथं चोरट्यांनी एका धुणीभांडी करणाऱ्या महिलेच्या घरी चोरी केली. ही चोरी सध्या धुळ्यात चर्चेचा विषय ठरली आहे. सर्वांना उत्सुकता एकच की धुणंभांडी करणाऱ्या महिलेच्या घरात चोरांच्या हाती काय लागलं? त्याबाबतही आता माहिती समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उषाबाई गोविंद मेटकर या धुळे शहरात बिलाडी रोड परिसरात राहातात. सुगंध आकर्षण सोसायटीत त्याचं घर आहे. त्या धुणीभांडी करून आपलं घर चालवतात. मेहनत केल्यानंतर चार पैसे त्यांना भेटतात. पण त्यांच्याच या मेहनतीच्या पैशांवर चोरांनी डल्ला मारला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे घरात उकाडा जाणवत असल्याने उषाबाई या झोपण्यासाठी घराच्या छतावर गेल्या. जाताना त्यांनी घराला कुलूप ही लावलं.
हीच गोष्टी चोरांनी हेरली. उषाबाई छतावर झोपण्यासाठी गेल्यानंतर चोरांनी सोसायटीत घुसखोरी केली. त्यानंतर उषाबाईंच्या रुमचे कुलूप त्यांनी तोडले. घरात काही मौल्यवान वस्तू, कॅश आहेत का याची शोधाशोध चोरांनी केली. त्यावेळी त्यांच्या हाताला उषाबाईंच्या कापाटात एक लाख रुपयांची कॅश लागली. त्यांनी आणखी शोधाशोध केली. त्यानंतर त्यांना सोन्याचे दागिने सापडले. या दागिन्यांची किंमत जवळपास एक लाख रुपये आहे.
सकाळी ज्या वेळी उषाबाई छतावरून घरी आल्या त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घराचे टाळे तोडले होते. त्यामुळे घरात कुणी तरी घुसल्याचं त्यांना समजलं. ज्या वेळी त्या घरात गेल्या त्यावेळी घर अस्ताव्यस्त होतं. कपाट ही फोडलं होतं. त्यानंतर घरातून मेहनतीने साठवलेला एक एक रुपया चोरांनी चोरला होता. मेहनतीचा पैसा एका क्षणात कुणी तरी चोरला होता. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. त्यांनी याबाबत देवपूर पोलीसात तक्रार दिली. आता पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world