अमजद खान, प्रतिनिधी
कल्याणमधील एका तरुणीवर भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणजवळील आंबिवली गावात हा प्रकार घडला. या प्रकरणात अरविंद जाधव या भोंदू बाबा विरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भोंदू बाबा अरविंद जाधवने आणखी काही मुलींसोबत असं दृष्कृत्य केलं आहे का, याचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
कल्याणमधील एका तरुणीला अनेक दिवसांपासून कौटुंबिक त्रास सुरू होता. कौटुंबिक त्रास दूर होण्यासाठी या तरुणीला नातेवाईकांकडून आंबिवली येथील एका बाबाचा पत्ता देण्यात आला. आंबिवली येथील हा बाबा कौटुंबिक कलह दूर करून घरात सुख शांती आणतो अशी माहिती या तरुणीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पीडित तरुणीने नातेवाईकांना सोबत घेऊन आंबिवली येथील अरविंद जाधव या बाबाकडे जाऊन आपली व्यथा मांडली.
नक्की वाचा - Crime news: आधी प्रेम केलं मग हत्या! तो सुटलाच होता, पण डी मार्टच्या पावतीमुळं अलगद अडकला
'तुझा त्रास दूर होईल मात्र तुला काही वेळ इथेच थांबावं लागेल. तुझ्या घरच्यांना बाहेर जाऊ दे. तू इथेच थांब, तुझी नजर उतरवून घेतो' असं सांगत भोंदू बाबाने या तरुणीच्या शरीरावर हात लावण्यास सुरुवात केली. तरुणीला हा स्पर्श वासनेचा लक्षात आल्यानंतर तरुणीने बाबाला हात लावण्यास मनाई केली. आणि झालेला प्रकार सर्वांना सांगणार असल्याचं सांगितलं. त्यावेळेस भोंदू बाबाने या तरुणीला धमकी देत या प्रकाराची माहिती कोणाला दिली तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. यानंतर तरुणीने कुटुंबासोबत खडकपाडा पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथं घडलेला प्रकार सांगितला.
पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करीत भोंदू बाबाला बोलावून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणात त्याला नोटीस देऊन पोलीस स्टेशनला यायला सांगितले. मात्र दोन दिवस झाले तरी अरविंद जाधव याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही हे लक्षात येताच तरुणीने सामाजिक संघटनेच्या मदतीला धावली. सामाजिक संस्थेच्या मदतीने तिने पुन्हा एकदा खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि भोंदू बाबा विरोधात काय कारवाई केली असा सवाल उपस्थित केला.
नक्की वाचा - Crime news: दोन मैत्रिणी, एक पार्टी, मित्र आला अन् पार्टीत नको तेच घडलं
शेवटी सामाजिक संघटना आणि पीडित मुलीच्या दबावानंतर पोलिसांनी तपास सुरू करत या भोंदू बाबाला अटक करण्यासाठी पथक रवाना केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांची भेट घेतली भोंदू बाबावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि याबाबाने आणखी काही मुलींसोबत हा घाणेरडा प्रकार घडला आहे का, याचीही चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world