जाहिरात

Kalyan News : RPF च्या वर्दीतील 'तो' अधिकारी कोण? ओळख पटताच कल्याण स्टेशनवर खळबळ

Kalyan News : कल्याण रेल्वे स्टेशनवर (Kalyan Railway Station) रेल्वे संरक्षण दलाची (RPF) खोटी वर्दी परिधान करून फिरणाऱ्या एका तरुणाला आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी (GRP) अटक केली आहे.

Kalyan News : RPF च्या वर्दीतील 'तो' अधिकारी कोण? ओळख पटताच कल्याण स्टेशनवर खळबळ
Kalyan News : एका आरपीएफ जवानाने त्या अधिकाऱ्याची चौकशी केली असता, त्याची बोबडी वळली.
कल्याण:

Kalyan News : कल्याण रेल्वे स्टेशनवर (Kalyan Railway Station) रेल्वे संरक्षण दलाची (RPF) खोटी वर्दी परिधान करून फिरणाऱ्या एका तरुणाला आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी (GRP) अटक केली आहे. अविनाश जाधव (Avinash Jadhav) असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव असून, तो मूळचा धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील भूम (Bhum) येथील रहिवासी आहे. लहानपणापासून त्याला पोलीस वर्दीची प्रचंड क्रेझ होती. पोलीस दलात नोकरी करण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली नाही, म्हणून त्याने हा खोटा बनाव रचला होता. विशेष म्हणजे, त्याने आपल्या वयस्कर आई-वडिलांना आपण पोलीस झालो असल्याचे खोटे सांगितले होते.

काय आहे प्रकरण?

बुधवारी कल्याण रेल्वे स्टेशन नेहमीप्रमाणे प्रवाशांनी गजबजलेले होते. आरपीएफ आणि जीआरपी पोलीस स्टेशन परिसरात नियमित गस्त घालत होते. याच दरम्यान, आरपीएफच्या जवानांना स्टेशनवर खांद्यावर एका स्टारची (ASI One Star) फित लावलेला एक अधिकारी फिरताना दिसला. हा अधिकारी कल्याण स्टेशनवर यापूर्वी कधीही दिसला नसल्यामुळे जवानांना संशय आला. 

( नक्की वाचा : Dombivli News : डोंबिवलीतील 'त्या' रात्रीचा खुलासा! चाकूचे सपासप वार करणाऱ्या 6 जणांना बेड्या )
 

एका आरपीएफ जवानाने त्या अधिकाऱ्याची चौकशी केली असता, त्याची बोबडी वळली आणि हा अधिकारी नसून, केवळ वर्दी घालून फिरणारा तोतया असल्याचे उघड झाले. तातडीने आरपीएफच्या जवानांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कल्याण जीआरपीच्या स्वाधीन केले.

Latest and Breaking News on NDTV

तोतया अधिकाऱ्याची पार्श्वभूमी

कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी या दिलेल्या माहितीनुसार अटकेत असलेल्या अविनाश जाधव याने FYBA पर्यंत शिक्षण घेतले आहे. तो चरितार्थ चालवण्यासाठी एका हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करत होता. त्याचे आई-वडील गावी शेती करतात. अविनाशला लहानपणापासूनच पोलीस वर्दीचे आकर्षण (क्रेझ) होते. या तीव्र इच्छेपोटीच त्याने आरपीएफची वर्दी परिधान करून तो स्टेशनवर फिरत असताना पकडला गेला.

( नक्की वाचा : Kalyan Station: आई-वडिलांना गाढ झोपेत पाहून बाळाला पळवले! तरुण-आत्याने 8 महिन्यांच्या चिमुकल्याचे काय केले? )
 

पोलीस तपासात अविनाश जाधव याने आरपीएफची वर्दी घालून आतापर्यंत कोणतेही गैर कृत्य केले असल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही. तरीही, तो नेमक्या कोणत्या हेतूने वर्दी घालून फिरत होता आणि यामागे आणखी काही कारण आहे का, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. आरपीएफ आणि कल्याण जीआरपी पोलिसांनी त्याला अटक केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com