बदलापुरातील (Badlapur Child abuse) चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश पेटून उठला आहे. याविरोधात बदलापूरकरांनी आंदोलन पुकारलं. याबरोबर राज्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने उद्या 24 ऑगस्ट रोजी बंद (Maharashtra Bandh) पुकारलं आहे. याबाबत आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सर्वांनी बंदात सामील होण्याचं आवाहन केलं आहे.
आमची बहीण सुरक्षित असणं महत्त्वाचं आहे. दररोज येत असलेल्या बातम्या वाचून संतापाचा कडेलोट होत आहे. बदलापुरात झालेल्या घटनेचा विरोध करण्यासाठी येथे आंदोलन पुकारणाऱ्यांना आरोपीसारखं कोर्टात आणलं होतं. या सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायला हवेत. आपल्या घरापर्यंत ही विकृती येऊ नये यासाठी उद्या महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आहे, असं ठाकरे म्हणाले.
नक्की वाचा - 'तू मला आवडतेस', स्कूल व्हॅन चालकाचा मेसेज, विद्यार्थिनी घाबरली, पुण्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
ते पुढे म्हणाले, उद्याचा बंद हा राजकीय हेतुने प्रेरित नाही. उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत बंद असेल. आपण कोणत्याही जाती-धर्म-पक्षाचे असाल तरी आपल्या लेकी-बहिणींसाठी उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हा. उंबरठ्यावर आलेलं संकट दूर करा. बहिणीची किंमत ही मतं नाही तर नात्यात आहे. आम्ही नातं जपणारी माणसं आहोत. बहिणींची मतं सरकार विकत घेऊ शकत नाही. बहिणींची किंमत पैशात मोजू नका. सर्वांनी स्वत:हून या बंदमध्ये सहभागी व्हा. हायकोर्टासह जनतेच्या न्यायालयाने याची दखल घेतल्याचं उद्या दाखवून द्या. बदलापूर प्रकरणात पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याने हायकोर्टाने त्यांना खडे बोल सुनावले. कायदा ज्यांच्या हातात आहे, ते रक्षण करत नाही. जे जे कोणी नराधमांचे पाठीराखे असतील ते उद्या उघड होईल. विकृती विरूद्ध संस्कृती असा उद्याचा बंद असेल, असं म्हणत ठाकरेंनी सर्वांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं.
- उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बंद असेल.
- सर्वांनी स्वत:हून या बंदमध्ये सामील होण्याचं ठाकरेंचं आवाहन
- बंद काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
- बंद काळात बस आणि रेल्वे बंद ठेवण्याचं आवाहन.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world