
देवा राखुंडे
इंस्टाग्रामवर केलेल्या मेसेजचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून करण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावात शनिवारी तीन एप्रिलला संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर वालचंदनगर पोलिसांनी पाच तासाच्या आत या घटनेतील आरोपीला गजाआड केलं आहे.आकाश मुशा चौगुले असं 22 वर्षीय खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर याप्रकरणी राजेश ऊर्फ तात्या सायबु पवार या 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. खून झालेला व्यक्ती आणि आरोपी हे दोघे एकाच गावातील आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश ऊर्फ तात्या सायबु पवार याने त्याच गावातील आपला नातलग असलेल्या आकाश मुशा चौगुले याच्या इंस्टाग्रामवर आकाश चौगुले यांच्या बहिणीचा फोटो मेसेज करून पाठवला होता. यावरून आकाश चौगुले आणि आकाशची आई शांतबाई चौगुले हे राजेश पवार याच्याकडे त्याच्या मौजे अंथुर्णे येथील घरी जाब विचारण्यासाठी गेले होते. आकाश चौगुले याने राजेश याला तू माझ्या बहिणीचा फोटो इंस्टाग्रामवर मला का पाठवला अशी विचारणा केली.
त्याचा राग मनता धरुन राजेश पवार याने आकाश चौगुले याचा गळा दाबुन त्याला उचलुन मोकळया जागेमध्ये पडलेल्या दगडावर जोरात आपटले. त्यानंतर आकाश चौगुले हा निचपीत पडला. तो हालचाल करत नव्हता. त्याच वेळी राजेश पवार याने तिथून पळ काढला. त्यानंतर आकाश चौगुले याला उपचारासाठी त्याच्या लासुर्णे येथील देसाई हॉस्पीटलमध्ये ऍडमिट केले. मात्र आकाशचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. या घटनेची वालचंदनगर पोलिसांना माहिती मिळताच प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे घटनास्थळी भेट देवून घडलेल्या घटनेची संपुर्ण माहिती घेतली.
त्यानंतर सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शन आणि सुचनेप्रमाणे मारहाण करणारा राजेश ऊर्फ तात्या पवार याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात करण्यात आली. यावेळी तो कडबनवाडी गावच्या हद्दीमधील वनविभागाच्या क्षेत्रामध्ये लपुन बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सदर आरोपीचा मोठ्या शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेतले. मृ्त आकाश चौगुलेच्या आईच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर हे करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world