
प्रांजल कुलकर्णी, नाशिक: नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात जमावाकडून पोलिसांनाच बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इगतपुरी पोलिस ठाण्याचे कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ अशी मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी गेले असता फाशी घेतल्याचा दावा केल्याने आदिवासी जमाव संतप्त झाला अन् ही मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिसांचे कपडे फाडत त्यांना जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील जामुंडा गावच्या धाडवाडी शिवारात समोर आली आहे. धाडवाडी शिवारात 30 मार्चला एका झाडाखाली एक मृतदेह आढळल्याने इगतपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान पोलीस तिथे पोहोचताच झाडाच्या फांदीला अर्धी ओढणी आणि अर्धी ओढणी मृतदेहाच्या गळ्याला आढळून आली होती.
पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवत तो बहु सखाराम दरवडे याचा असल्याचे समोर आले होते. त्यानंतर रात्रीतूनच मृतदेह ॲम्बुलन्सने रुग्णालयात नेण्यात आला होता. दरम्यान दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी बहुच्या घातपाताचा संशय व्यक्त केला असता पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे आश्वासन नातेवाईकांना दिले मात्र पोलिस गावात चौकशी साठी आलेले असतांनाच जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि यातूनच जमावाने पोलिसांवर हा हल्ला केला.
(नक्की वाचा- महिलेच्या जाळ्यात फसला! 150 रुपयांचा मोह, सागर कारंडेकडून 60 लाख लुटले, कसा झाला स्कॅम?)
याप्रकरणी 50 ते 60 अज्ञात जमावावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी मात्र 4 दिवस उलटून देखील कोणाला अटक करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शवविच्छेदन अहवालातून गळफास घेतल्यानेच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नातेवाईकांच्या तक्रारीनूसार पुढील चौकशी करण्यात येईल असं पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world