पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सेवानिवृत्त झालेले सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेतून ही बाब समोर आली आहे. पोलीस दलातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी घरकाम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांची अवस्था पोलीस कर्मचारी कमी घरगडी जादा अशी झाली आहे. विशेष म्हणजे राज्यभरातले जवळपास तीन हजार पोलीस कर्मचाऱ्यांवर अशी वेळ आली आहे.
त्रिवेदींच्या याचिकेत काय?
महाराष्ट्र पोलीस दलातून सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी हे निवृत्त झाले आहेत. त्यांना पोलीसांबरोबर असं वर्तन केलं जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीनं मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना घरगडी ठेवण्याचा प्रकार सर्वांच्या समोर आला आहे. न्यायालयानेही या जनहित याचिकेची गांभीर्याने दखल घेतलीय. मुंबईत जवळपास १२७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी तब्बल २९४ पोलीस कर्मचारी नियुक्त आहेत. तर राज्य पोलीस दलातील १२ पोलीस आयुक्तालये, ३४ जिल्हा अधीक्षक कार्यालयात जवळपास ६०० वर वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्याकडे एक दोन नाही तर तब्बल तीन हजारांवर पोलीस कर्मचारी घरकामासाठी नियुक्त केले गेल्याची माहितीही या माध्यमातून समोर आली आहे.
हेही वाचा - काय झालं रे मेळाव्यात... राज ठाकरेंच्या भाषणानंतर सोशल मीडिया सुसाट!
पोलीस कर्मचाऱ्यांत नाराजी
पोलीस दलात भरती होण्यासाठी तरूण मेहनत घेतात. एका प्रयत्नात यश नाही आलं तर पुन्हा प्रयत्न करतात. ९ महिन्याचं अवघड प्रशिक्षण घेतात. पोलीस दलात जाऊन काही तरी करण्याचं त्याचं स्वप्न असतं. पण भरती झाल्यानंतर त्यांना अशी घरकामं करावी लागत असल्यानं त्यांच्या पदरी मोठी निराशा पडते. त्यामुळे अशा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
हेही वाचा - 'आधी पाणी द्या, मग मत मागा' गावागावात पाणी प्रश्न पेटणार?
कोणती कोणती करावी लागतात कामं
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी पोलीस कर्मचाऱ्यांना वेगवेगळी कामं करावी लागत असल्याचंही समोर आलं आहे. मुलांना शाळेत सोडणे, बाजारात जाणे, किरणा आणून देणे, बागकाम या सारखी कामं करावी लागतात. खरं तर यांची नियुक्त घरच्या सुरक्षेच्या कारणासाठी केली जाते. पण त्याच बरोबर त्यांच्याकडून घरकामही करून घेतलं जात आहे.
हेही वाचा - 20 वर्षांच्या मुलानं केला कुणालाही न जमलेला रेकॉर्ड
पोलिस बॉइज संघटनेनं व्यक्त केली चिंता
पोलीस कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीची कामं करावी लागत असतील तर ती गंभीर बाब आहे. पोलीस घरगडी झाला तर ती चुकीची गोष्ट आहे. त्यांना त्यांच्या योग्यतेचं काम द्या, ते त्याला जरूर न्याय देतील. असं पोलिस बॉइज संघटनेचे राहुल दुबाले यांनी स्पष्ट केलं आहे. तर पोलीस कर्मचाऱ्यांचा घरगडी म्हणून वापर केला जात नसल्याचं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी या जनहित याचिकेतून पुढे काय येतं याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा - ग्राहक झालेत फिटनेस फ्रीक, नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये देशी-परदेशी फळांच्या मागणीत वाढ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world