मोसिन शेख, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत चिखलठाणा परिसरातील एका बोगस कॉल सेंटरवर धाड टाकली आहे. या कारवाईत तब्बल १८० आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात मेघालय, नागालँड आणि सिक्कीम राज्यातील तरुण-तरुणींचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर गेल्या एक वर्षापासून सुरू होते. कॉल सेंटरच्या आतमध्ये पडदे लावून अत्यंत गुप्त पद्धतीने सेंटर चालवले जात होते. रात्री साडेसहा वाजल्यापासून सकाळपर्यंत काम चालायचे आणि त्या वेळी हाय प्रोफाइल गाड्यांमधून कर्मचारी आत येत असत. या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना फसवणुकीचे कॉल केले जात होते. ‘अमेझॉनचे गिफ्ट व्हाऊचर लागले आहे' या आमिषाखाली त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली गेल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
नक्की वाचा - Jalna ZP: जालन्यात फुटीनंतर महायुतीची परीक्षा; आरक्षणानंतर कुणाला 'लॉटरी', कुणाला धक्का? वाचा सविस्तर
या ठिकाणी काम करणाऱ्या तरुण-तरुणींना २५ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जात होता. पोलिसांनी सांगितले की, आरोपींपैकी बहुतेक मेघालय, नागालँड आणि सिक्कीम राज्यातील आहेत. सदर इमारत मुळ्ये नावाच्या व्यक्तीची असून ते एमआयडीसीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होते. त्यांच्या मुलांनी कंपनी सुरू करण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र दोन्ही मुले परदेशात गेल्यानंतर ही इमारत भाड्याने देण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी १०० हून अधिक अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला होता. सध्या पोलिसांकडून सर्व संगणक, सर्व्हर आणि कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. तपासात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
