रेवती हिंगवे
पुण्यामध्ये गुंडांनी थैमान घालायला सुरुवात केली असून. विरोधी टोळ्यांनी कट रचून एकमेकांचा बदला घेण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर एका तरुणावर बुधवारी सकाळी जीवघेणा हल्ला करण्यात आला. दोन तरुणांनी या तरुणावर हल्ला केला आहे. यातील एका तरुणाच्या हातात कोयता होता तर दुसऱ्याच्या हातात पट्टा होता. सागर चव्हाण या हल्ल्यात जबर जखमी झाला आहे. या घटनेची सीसीटीव्ही दृश्येही हाती लागली असून सागर चव्हाण याच्यावर तो शुद्ध हरपून कोसळेपर्यंत कोयत्याने वार करण्यात आल्याचे दिसते आहे. हा हल्ला बदला घेण्यासाठी करण्यात आला होता अशी माहिती मिळते आहे.
हे ही वाचा : दगडांना बांधलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, 2 वर्षांच्या मुलीलाही सोडले नाही
एकमेकांकडे बघण्यावरून राडा
मे महिन्यामध्ये पुण्यातल्या डहाणूकर कॉलनीमध्ये एक राडा झाला होता. श्रीनिवास वत्सलवार आणि काही जणांमध्ये 'माझ्याकडे का बघतोस' या शुल्लक कारणावरून वाद झाला होता. वाद विकोपाला गेला आणि श्रीनिवासवर हल्ला करण्यात आला होता. यात श्रीनिवासचा मृत्यू झाला होता. त्याच्या हत्येमध्ये सागर चव्हाणचाही असल्याचे बोलले जात होते. यामुळे सागरचा काटा काढण्यासाठी श्रीनिवासच्या मित्रांनी कट रचला होता. श्रीनिवासच्या मित्रांनी आज सकाळी सागरला बोलावले होते. तो येताच त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने हल्ला, हल्ल्यात तरुण गंभीर जखमी | NDTV मराठी #pune #crime #ndtvmarathi pic.twitter.com/hrZvMe84pI
— NDTV Marathi (@NDTVMarathi) September 4, 2024
जामीन मिळताच 'मकोका'च्या आरोपींनी केली हत्या
पुण्यामध्येच आज सकाळी आणखी एक हत्या करण्यात आली आहे. सुनील सरोदे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे यांना अटक केली आहे.
पुण्यात खुनाचं सत्र थांबायचं नाव घेईना, गुलटेकडी भागात मध्यरात्री तरुणाची हत्या | NDTV मराठी #pune #crime #ndtvmarathi pic.twitter.com/BfoLxnCa4U
— NDTV Marathi (@NDTVMarathi) September 4, 2024
हे दोघेही अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर मकोका(MCOCA) अर्थात संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. हे दोघेही जामिनावर सुटले होते आणि जामिनावर बाहेर येताच या दोघांनी सुनीलचा खून केलाय. दोघांनी सुनीलला का मारलं याचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये.