
सुजित आंबेकर
जामीन मंजूर करण्यासाठी न्यायाधीशानेच लाच मागितल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली असून महिलेच्या तक्रारीच्या आधारे न्यायाधीशाविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल होताच न्यायाधीश फरार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सातारा शहर पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम अन्वये चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता.माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी मुंबई), जिल्हा सत्र न्यायाधीश आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वडिलांच्या जामिनीसाठी मुलीकडे पैशांची मागणी
तक्रारदार तरुणीच्या वडिलांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात त्यांना जामीन देण्यासाठी न्यायाधीश निकम आणि त्यांच्या साथीदारांनी तक्रारदार महिलेकडे लाच मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जामीन अर्ज करण्यापासून जामीन देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी सुलभतेने पार पाडण्यासाठी ही लाच मागण्यात आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या सगळ्यासाठी एका आरोपीने तक्रारदार महिलेची आणि न्यायाधीशांची भेटही घडवून देण्याचे आश्वासन दिले होते. महिलेने केलेल्या तक्रारीची खातरजमा केल्यानंतरच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
नक्की वाचा : बंगळुरुतील इंजिनिअर अतुल सुभाषची पत्नी Nikita Singhania कोण आहे?
'कोडवर्ड'मध्ये संभाषण
9 डिसेंबर रोजी तक्रारदार महिला आरोपींसह बोलणी करण्यासाठी गेली होती. एक आरोपी महिलेला न्यायालयाबाहेर ठरलेल्या एका जागी घेऊन गेला. तिथे अन्य दोन आरोपी आधीपासून हजर होते. 'मिटींग' च्या ठिकाणी पोहोचल्यानंतर न्यायाधीशांसोबत अन्य आरोपींनी फोनवरून बोलणे केले. न्यायाधीश 'कोडवर्ड' वापरून त्यांच्याशी बोलत होते असे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. त्यानंतर या आरोपींनी महिलेच्या हॉटेलवर जाऊन रक्कम घेण्यासाठी आम्ही येतो असे सांगितले. यावर महिलेने त्यांना सांगितले की ज्या व्यक्तीने माझी आणि न्यायाधीशांची भेट घालून दिली, त्या व्यक्तीशिवाय मी कोणालाही पैसे देणार नाही. या सगळ्या प्रकाराची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नक्की वाचा : माणुसकीचा मृत्यू; अर्ध शरीर गाडीखाली, महिलेच्या मृतदेहाला ओरबाडत राहिला
न्यायाधीशाच्या अटकेसाठी प्रयत्न
गुन्ह्यामध्ये न्यायाधीशाचे नाव आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकारांनी त्यांना फोन, मेसेजद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातल्या एकाही मेसेज किंवा कॉलला न्यायाधीशाने प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी या न्यायाधीशाला अटक करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे परवानगी अर्ज दाखल केला आहे.