महिला डॉक्टरने आत्महत्या केली. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. अनेकांची नावं ही त्यात पुढे आली आहेत. एका डॉक्टर महिलेच्या आत्महत्येभोवती 7 नावांची चर्चा होत आहे. त्यात पहिलं नाव आहे आरोपी गोपाल बदने, आरोपी प्रशांत बनकर याचं. त्यानंतर कोणती नावं चर्चेत आहेत ते हा पाहूयात. त्यात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे,भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. हे संपूर्ण प्रकरण आता या सात नावां भोवती फिरत आहे. त्याला कारण ही तसेच आहे. ही सात कॅरेक्टर डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणाशी कोणत्या ना कोणत्या कारणाने जोडली गेली आहेत. गोपाल बदने हा या प्रकरणातला पहिला संशयित आरोपी आहे. महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर तीच्या हातावरील सुसाईड नोटमधून पहिलं नाव समोर आले ते याच गोपाल बदनेचं होतं. गोपाल बदननेनं चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख हातावरील सुसाईड नोटमध्ये होता. PSI गोपाल बदने हा फलटण ग्रामीण पोलीस विभागात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता. स्थानिक पातळीवर विविध गुन्ह्यांच्या तपासात सहभागी होता. महिला डॉक्टरने त्याच्यावर या आधीही मानसिक छळाचा आरोप केला होता. गोपाल बदने हा देखील महिला डॉक्टरच्या बीड जिल्ह्यातलाच आहे हे विशेष.
गोपाल बदने आणि डॉक्टर महिलेचे संबंध असल्याचा संशय पोलिसांना या प्रकरणात पहिल्यांदा आला. त्यानंतर पोलिसांना डिजिटल पुरावे तपासले आणि यातूनच गोपाल बदनेचे मृत डॉक्टर महिलेशी संबंध असल्याचं समोर आलं. संशयित आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि डॉक्टर महिलेचे बोलणे, चॅटिंग सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिली होती. आरोपी PSI गोपाल बदने याने शरण येण्यापूर्वी आपलं मोबाईल लपवलाय. त्यामुळे आरोपी पुरावे लपवत असल्याचा संशय व्यक्त होतोय.
गोपाल बदनेनंतर या प्रकरणातला सर्वात महत्वाचं कॅरेक्टर म्हणजे प्रशांत बनकर. प्रशांत बनकरचं नाव देखील महिला डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोटमध्ये आढळून आलं आणि चर्चांना उधाण आलं. प्रशांत बनकर याने मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये होता. त्यामुळे संशयाचे ढग आणखीनच दाटले. पण तिचे हे आरोप बनकरच्या बहीणीने फेटाळले होते. आपला भाऊ निर्दोष असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रशांत बनकरच्याच घरी महिला डॉक्टर राहायची. ही माहिती समोर येताच वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू झाल्या. महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांचे संबंध होते असं देखील समोर आलं आहे. पण यात मोठा ट्विस्ट आणला तो प्रशांत बनकरच्या बहिणीने. महिला डॉक्टरनेच प्रशांतला प्रपोज केलं होतं आणि लग्नाचा तगादा लावला होता असा आरोप तिने केला होता.
यानंतर सगळ्यात मोठा ट्विस्ट आणला तो ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी. अंबादास दानवे यांनी मृत महिला डॉक्टरने पोलिसांविरोधात केलेल्या तक्रारीतील मा. खासदार हा उल्लेख रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा असल्याचा दावा केला. महिला डॉक्टरने जुलै महिन्यात स्थानिक पोलीस आरोपींना फिट-अनफिटचं सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणतात अशी तक्रार केली होती. याच तक्रारीत मा. खासदार आणि त्यांच्या पीएचा उल्लेख आहे. मा खासदार म्हणजेच भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.
अंबादास दानवे यांच्या आरोपानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं. महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात रणजितसिंह नाईक निंबाळकरांची एन्ट्री झाली आणि प्रकरणाचं महत्व आणखी वाढलं. यानंतर निंबाळकरांनी पुढे येत मी फोन केले असतील पण आत्महत्या प्रकरणाशी माझा संबंध काय? असा प्रतिसवाल केला. त्यानंतर फडणवीसांनी देखील निंबाळकरांची पाठराखण केली. मृत महिला डॉक्टर ही बीड जिल्ह्यातली आहे. त्यामुळेच फलटणमध्ये कार्यरत असताना ती बीडची आहे असं म्हणत तीला टोमणा मारले जायचे. बीडचे कसे गुन्हेगार असतात असं म्हणून तीचा मानसिक छळ केला जायचा असं तक्रारीत म्हटलं होतं. यावरूनच बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे आक्रमक झाले होते. याप्रकरणात सखोल चौकशीची मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे.
या प्रकरणातली महत्वाची एन्ट्री म्हणजे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची. डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी अनेक थिएरी पुढे येतायत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तरुणीची हॉटेलमध्ये बोलावून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली. महिला डॉक्टर आत्महत्येनं राज्यभर खळबळ माजली. यानंतर या प्रकरणात नेहमी प्रमाणे एन्ट्री झाली ती महिला आयोगाची. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटणमध्ये जाऊन पोलिसांची भेट घेतली. प्रकरणाची माहिती घेतली आणि यानंतर पत्रकार परिषदेत गंभीर दावा केला. लक्ष्मीपूजनच्या दिवशी महिला डॉक्टर आरोपी प्रशांत बनकरच्या घरी गेली. यादोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर त्या घरातून बाहेर पडल्या असा दावा यावेळी रुपाली चाकणकरांनी केला होता. महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाला प्रेमाचा, सरकारी कामात त्रास दिल्याचा आणि ऊसतोड कामगारांसंबंधितच्या तक्रारीचा देखील अँगल आहे. गेल्या 4 दिवसात या प्रकरणात 7 कॅरेक्टर समोर आले आहेत. यातले 3 कॅरेक्टर आरोपांच्या फेऱ्यात आहेत. तर 4 कॅरेक्टर हे आरोप करणारे आहेत. त्यामुळे आता पुढे कोणकोणते कॅरेक्टर समोर येणार आणि प्रकरणाचा द एन्ड न्यायाने होणार की राजकारणाने हे पाहावं लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world