गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी
Sindhudurg News: गोवा-दोडामार्ग ते बेळगाव-कोल्हापूर या मार्गावर तिलारी धरणाचे पाणी तिलारी नदीपात्रात जिथे मिळते, त्या पुलाजवळ कोनाळ स्मशानभूमीच्या काही अंतरावर एका बेवारस कारमध्ये मानवी रक्ताचे डाग आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही कार झाडीत ढकलून ठेवलेल्या अवस्थेत सापडली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
तिलारी पुलाजवळ काही गुराखी गुरे घेऊन गेले असता त्यांना ही बेवारस कार आढळली. त्यांनी याची माहिती पोलीस पाटील आणि दोडामार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या नेतृत्वाखालील पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी तपासणी केली असता कारचे नंबर प्लेट आणि कागदपत्रे गायब केल्याचे दिसले. मात्र, पोलिसांनी चेसिस नंबरवरून तपास केला असता, ही कार आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) राज्यातील असल्याचे स्पष्ट झाले.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये थरार! ड्रायव्हरला मारहाण करून Ola Car पळवली; ‘या' कारणामुळे चोर 2 तासांत जाळ्यात )
मानवी रक्ताचे डाग आणि संशय
बेवारस अवस्थेत आढळलेल्या या कारचे दरवाजे पोलिसांनी उघडले असता, पुढील तसेच मागील सीटवर आणि खाली मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग दिसून आले. या डागांच्या वासावरून ते मानवी रक्त असावे असा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे या भागात कोणत्याही प्रकारचा घातपात तर झाला नाही ना? असा संशय बळावला आहे.
तपासात अडथळे
कारमध्ये एक गॅरेज नंबर सापडला, जो बेळगाव (Belgaum) येथील असल्याचे कळले. पोलिसांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला, पण तो कन्नड भाषेत बोलत होता आणि नंतर त्याने आपला फोन बंद केला. यामुळे पोलिसांच्या तपासात तात्पुरता अडथळा निर्माण झाला आहे.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न?
रक्ताचे डाग कुणाचे आहेत, कारमध्ये नेमका काय प्रकार घडला आणि ही कार नदीपात्राच्या दिशेने झाडीत तटस्थ (neutral) करून का ढकलून दिली, याचा तपास करणे दोडामार्ग पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे.
रक्ताचे डाग आढळल्याने पोलिसांनी नदीपात्रात आणि पुलाखाली काही संशयास्पद वस्तू किंवा पुरावा मिळतो का, याचीही पाहणी केली. मात्र, डिकीमध्ये काहीही सापडले नाही. त्यामुळे कारमध्ये निश्चित काहीतरी घडल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ती येथे ढकलून देण्यात आली असावी, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world