
उत्तर प्रदेशातील मैनपुरी इथल्या एका कुटुंबाची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा समोर आली आहे. त्यावर विश्वास ठेवणेही कठीण झाले आहे. या कुटुंबात 17 वर्षांत 10 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. शुक्रवारी याच कुटुंबातील 18 वर्षीय जितेंद्र या तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. तो फळ तोडण्यासाठी बाहेर जातो असं सांगून गेला. पण घरी परत आलाच नाही. जेव्हा त्याची शोधाशोध केली त्यावेळी तो जवळच्या गावाच्या सीमेवरील एका झाडाला लटकलेला आढळला. बहीणीच्या ओढणीनं त्याने गळफास घेतला होता. त्यानंतर या कुटुंबात एकच आक्रोश सुरू झाला. त्याच्या आईने तर हंबरडाच फोडला. देवा अजून आमच्या घरातली किती जीव घेणार आहेस असं ती बोलत होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना बेर पोलीस ठाणे परिसरातील सकत गावाची आहे. हिरालाल यांनी सांगितले की, माझा नातू जितेंद्र सकाळी 10 वाजता जेवण करून शेताकडे निघाला होता. तो म्हणाला होता की, जांभळे खाण्यासाठी जात आहे. थोड्या वेळाने परत येईन. ऊन जास्त असल्यामुळे बहिणीची ओढणी घेऊन जात आहे असं ही तो बोलला. मात्र तो बऱ्याच वेळपर्यंत परतला नाही, तेव्हा माझा मुलगा रामबरन शेताकडे गेला, असं हिरालाल यांनी सांगितलं. त्यांनी सांगितले की, दुपारी दोन वाजता माहिती मिळाली की, त्याने गळफास घेतला आहे.
गेल्या पाच महिन्यांत त्यांच्या कुटुंबात आत्महत्येची ही चौथी घटना आहे. 21 दिवसांपूर्वी तरुणाच्या काकांनी विष घेवून आत्महत्या केली होती. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याची आईने एक आक्रोश केला. रडत-ओरडत ती त्या ठिकाणी पोहोचली. त्यावेळी ती कधी जमिनीवर हात आपटत होती तर कधी डोके. ती म्हणाली देवाने माझ्या लेकराला का उचलून नेले? थोड्या दिवसांपूर्वीच मुलगीही गेली, माझा दीरही गेला आणि अजून किती लोक मरतील. हे म्हणता म्हणता तरुणाची आई बेशुद्ध झाली. लोकांनी तिला कसेतरी सावरले.
ट्रेंडिंग बातमी - Nagpur Underworld Story: डॉनच्याच बायकोवर प्रेम! मग अफेअर, अपघात अन् संशय
जितेंद्रच्या मृत्यूच्या 21 दिवस आधी त्याचे काका बलवंत यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. जितेंद्रची सख्खी बहीण सौम्या हिने 4 महिन्यांपूर्वी घरातच गळफास लावून आत्महत्या केली होती. जितेंद्रचे चुलत आजोबा शेर सिंह यांनीही साडेचार महिन्यांपूर्वी फाशी लावून जीव दिला होता. 5 वर्षांपूर्वी 2020 मध्ये त्याचे काका मनीष यांनी फाशी लावून जीव दिला होता. 8 वर्षांपूर्वी 2017 मध्ये जितेंद्रचे दुसरे काका पिंटू यांनी आग लावून आत्महत्या केली होती. 10 वर्षांपूर्वी 2015 मध्ये जितेंद्रचे काका संजू यांनी विष प्राशन करून जीव दिला होता. आणि रविवारी जितेंद्रनेही गळफास लावून आत्महत्या केली.
यापूर्वी याच कुटुंबात सूरजपाल, महिपाल आणि रामसिंह यांनीही आत्महत्या केल्या आहेत. हे मृत्यू 2008 ते 2015 दरम्यान झाले आहेत. गावातील लोकांचे म्हणणे आहे की, या कुटुंबात काय अशुभ घडत आहे हे समजत नाही. गेल्या 10 वर्षांत अनेक लोकांनी आपला जीव दिला आहे. तर 2008 पासून 2025 पर्यंत म्हणजेच 17 वर्षांत 10 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. एकाच कुटुंबात इतक्या लोकांच्या आत्महत्यांमुळे गावातील लोकही घाबरले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह फासावरून खाली उतरवून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून नमुने गोळा केले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जमिनीपासून 7 फूट वर मृतदेह लटकलेला होता. पोलिसांनुसार, प्राथमिक तपासात हे आत्महत्येचे प्रकरण वाटत आहे. मृताच्या भावाने गजेंद्रने पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदवली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world