माढ्यामध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. राजीनामा स्विकार करावा अशी विनंती करणारे राजीनामा पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांना पाठवले आहे. मोहिते पाटील यांनी दिलेला राजीमाना ही माढा मतदार संघात भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. माढ्यातून भाजपने रणजीतसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज होते. त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात ते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांना राष्ट्रवादीकडून माढ्यात उमेदवारीही दिली जाणार असल्याचे जवळ निश्चित आहे.
मोहिते पाटलांच्या पत्रात काय?
धैर्यशील मोहिते पाटील यांनी हे राजीनामा पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहीले आहे. यात त्यांनी पद व सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारावा असे म्हटले आहे. ते पत्रात लिहीतात भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा, संघटन सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. शिवाय माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडल कार्यकारणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटनात्मक रचना गठीत करून कार्यान्वित करण्याचे कार्य केले. तसेच शक्तिकेंद्र, सुपर वॉरीयर, बूथ रचनाही पूर्ण करून सक्रीय केल्या. वेळोवेळी पक्षाचे विविध कार्यक्रम आयोजित करून संघटना व बूथच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतो. आपणास कळवू इच्छितो की, मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव, भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, त्याचा स्विकार व्हावा ही विनंती. अशा आशयाचे पत्र त्यांनी लिहीले आहे.
हेही वाचा - महायुतीचं जागा वाटप अडलं? भाजपचा नवा प्रस्ताव, दादा-भाई काय करणार?
धैर्यशील यांच्या पुढचे पर्याय काय?
धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र ती त्यांना मिळू शकली नाही. महायुतीत ही जागा भाजपकडे असल्याने मोहिते पाटील तिकडे जावू शकत नाहीत. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाकडे आहे. या पार्श्वभूमिवर धैर्यशील मोहित पाटील आणि शरद पवार यांची भेटही झाली आहे. त्यानंतर त्यांनी राजीनामाही दिला आहे. त्यामुळे पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे. बऱ्याच काळानंतर मोहिते पाटील पुन्हा एकदा शरद पवारांकडे यानिमित्ताने परतले आहेत.
हेही वाचा - भन्नाट ऑफर! मतदान करा... बोटाची शाई दाखवा... मोफत केस कापा...
कोण आहेत धैर्यशील मोहिते पाटील?
धैर्यशील मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत. धैर्यशील यांचे वडील राजसिंह मोहिते पाटील हे प्रगतशील शेतकरी आहेत. धैर्यशील यांनी राजकीय वाटचाल 2005 पासून सुरू केली. ते अकलुजचे सरपंच होते. पुढे ते माळशिरस पंचायत समितीचे सभापती झाले. 2012 त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2014 ला त्यांची जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी निवड झाली. 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रेवश केला. त्यांना जिल्हाचे संघटन मंत्रीपदही देण्यात आले होते.
हेही वाचा - लोकसभा निवडणूक : जाणून घ्या सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यात? महिलांचे वर्चस्व कुठे?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world