सुनिल दवंगे
विधानसभा निवडणुकीत कोण कोणत्या पक्षात आहे याचा अंदाज येत नाही. आज एका पक्षात असलेला उद्या दुसऱ्या पक्षात, तर उमेदवारी मिळाली तिसऱ्या पक्षात असेच काहीसं चित्र आहे. एवढचं काय नातीही या निवडणुकीत टिकलेली दिसत नाहीत. वडिलांविरोधात मुलगी, भावाविरोधात बहीण, काका विरोधात पुतण्या अशी सध्याची स्थिती आहे. पण राजकारणात असेही काही लोकं असतात जे पक्ष निष्ठा आणि पक्ष नेतृत्वाला अधिक महत्व देतात. ही माणसे नाती आणि पक्षावरील निष्ठा यात गल्लत करत नाहीत. या निष्ठेपोटीच अजित पवारांसोबत असलेल्या एका पदाधिकाऱ्याने त्याच्या मामाने दिलेली ऑफर नम्रपणे नाकारली. या पदाधिकाऱ्याचा मामा हा महाराष्ट्रातील मोठा नेता असून त्याने महसूलमंत्रीपदही भूषविले आहे. शिवाय हा नेता मुख्यमंत्रीपदाच्याही स्पर्धेत असल्याचे बोलले जाते. इतके सगळे असूनही तरुण पदाधिकाऱ्याने ऑफर नाकारली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्याची राजकीय स्थिती पाहात असं कुठे खरोखर घडलं असले का? असा प्रश्न तुम्हाला निश्चित पडला असेल. पण हे खरं आहे. संग्राम कोते पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षात आहेत. विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसपासून ते अजित पवारांबरोबर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतरही त्यांनी अजित पवारांनाच साथ दिली. या संग्राम कोते पाटील यांचे मामा म्हणजे राजकारणातलं बडं प्रस्थ म्हणावं लागेल. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे संग्राम कोते-पाटील यांचे मामा लागतात.
ट्रेंडिंग बातमी - पवार कुटुंबात दुरावा वाढला? ऐन दिवाळीत बारामतीत काय झालं?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिर्डी- राहता विधानसभा मतदार संघातून थोरात यांनी संग्राम कोते-पाटील यांना ऑफर देण्यात आली होती. त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी आग्रह धरला होता. हा मतदारसंघ भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदार संघ आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसला ताकदवान उमेदवार हवा होता ज्यासाठी मामाने भाच्याला साद घातली होती, मात्र संग्राम यांनी त्याला नम्रपणे नकार दिला. शिर्डी राहता मतदारसंघात आपण काम करत होतो, कार्यकर्त्यांची एक फळी उभी केली आहे. जनसंपर्कही या भागात चांगला आहे. सहकारी संस्थाच्या माध्यमातून कामही सुरू आहे असे त्यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - शिवसेना विरुद्ध शिवसेना! बाजी कोण मारणार? कदमांचा खळबळजनक दावा
या गोष्टी पाहाता आपले मामा बाळासाहेब थोरात यांनी आपल्याकडे विचारणा केली होती. पण आपण त्यास नकार दिला. ज्या अजित पवारांबरोबर आपण आहोत त्यांच्या बरोबरच कायम राहायचे असा आपला निर्णय आहे आणि काही झाले तरी पक्षनिष्ठ जपायची असा निश्चिम मी केल्याचे संग्राम यांनी सांगितले. नाती नात्यांच्या ठिकाणी आहेत, थोरांतांचे मार्गदर्शन आपल्याला नेहमीच मिळाले आहे. पण त्यांचा पक्ष वेगळा आणि माझा पक्ष वेगळा आहे असे संग्राम यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटले.
ट्रेंडिंग बातमी - दारू, डिजे, बेधुंद तरुण अन् 9 महिला! रंगलेल्या पार्टीत पोलीस घुसले अन् पुढे...
पक्ष जी जबाबदारी आपल्यावर देईल ती आपण पार पाडू. सध्या आपल्याकडे उत्तर महाराष्ट्राच्या प्रभारीपदाचा कार्यभार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे निरीक्षक पदही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे पक्षाने दिलेले काम करत राहू असे संग्राम यांनी म्हटले. संग्राम कोते पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांची ऑफर स्विकारली असती तर ते काँग्रेसचे उमेदवार असते. पण त्यांनी ते नाकारले. निवडणुकीच्या धामधुमीत पक्षनिष्ठा वैगरे काल्पनिक गोष्टी वाटू लागल्या असताना संग्राम कोते पाटील यांनी त्यांच्या पुढ्यात चालून आलेली संधी नाकारत पक्षनिष्ठेचे सर्वांसमोर उत्तम उदाहरण ठेवले आहे.