योगेश शिरसाट, अकोला
Akola Municipal Corporation Election : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली महायुतीतील जागावाटपाची चर्चा आज पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले असले, तरी प्रत्यक्षात मात्र तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.) हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार का, यावर अजूनही संभ्रम कायम आहे. त्यामुळे महायुतीतील इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते अंतिम निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण
महायुतीतील संभाव्य राजकीय समीकरणांवर सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवतील का, की भाजप वगळून शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी ५०–५० च्या फॉर्म्युल्यावर निवडणूक लढवतील, अशा विविध शक्यतांवर चर्चा सुरू आहे. जागावाटपाबाबत स्पष्टता नसल्याने प्रचाराची दिशा ठरवताना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे आजचा दिवस महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शनिवारी ट्विट करत महायुतीत खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या पाहिजेत, अशी ठाम भूमिका मांडत त्यांनी 25 जागा मागितल्या होत्या. मात्र काल ३५ ते ४० जागांची मागणी केली आहे. अन्यथा आजच आम्ही आमचा निर्णय घेऊ, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. या पार्श्वभूमीवर समेटाचा दुसरा टप्पा सुरू करत राज्यमंत्री इंद्रनील नाईक आज अकोल्यात गेल्या दोन दिवसापासून हा तिढा सोडण्यासाठी दाखल झाले. त्यांनी आमदार मिटकरी यांच्या निवासस्थानी सुमारे एक तास चर्चा केली. या चर्चेतून महायुती टिकणार की तुटणार, याचे संकेत मिळणार असल्याने अकोल्याच्या राजकारणाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
अकोल्यात काँग्रेस–शरद पवार गटाची युती निश्चित, महाविकास आघाडी सज्ज...
दुसरीकडे, अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांची युती जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. दोन्ही पक्ष संयुक्तपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात असून राजकीय वर्तुळात या लढतीकडे मोठ्या मुकाबल्याच्या रूपात पाहिले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसकडून आमदार साजिद खान पठाण, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. झिशान हुसेन, महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष संग्राम गवांडे, महानगर अध्यक्ष रफीक सिद्दीकी, प्रदेश संघटन सचिव जावेद झकरिया यांनी सहभाग घेतला. बैठकीत निवडणूक रणनीती, संघटन मजबूत करणे आणि संयुक्त प्रचारावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत एकत्रितपणे निवडणूक मैदानात उतरण्याचा आणि जनतेशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देण्याचा संकल्प नेत्यांनी व्यक्त केला. काँग्रेस 58 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 14 आणि आठ जागेवर मैत्रीपूर्ण लढत अशी चर्चा झाली आहे. मात्र, एका प्रभागाबाबत अद्याप अंतिम सहमती न झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्या प्रभागात लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून, अन्यथा तेथे मैत्रीपूर्ण लढतीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आज पुन्हा एक बैठक होणार असून त्यात महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अकोला महापालिकेची निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत रंगतदार ठरणार, हे स्पष्ट होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
