- ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये चैतन्या आहे असं अमित म्हणाले.
- मनसे नेते अमित ठाकरे यांनी मतदाना दिवशी दुबार आणि बोगस मतदारांविरुद्ध कडक धोरण आखल्याचे सांगितले आहे
- त्यांनी भाजपवर दुबार मतदार महाराष्ट्रात आणल्याचा आरोप केला आहे.
ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांचा माहोल मुंबई आणि महाराष्ट्रात पाहायला भेटतोय असा दावा मनसे नेते अमित ठाकरे यांनी केला आहे. NDTV मराठी डिजिटलचे संपादक श्रीरंग खरे यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. शिवाय मतदाना दिवशी मनसेचा सिक्रेट प्लॅन काय आहे ते ही त्यांनी सांगितले आहे. ठाकरे बंधूंची रणनिती काय आहे यावर ही त्यांनी भाष्य केलं आहे. शिवाय भाजप सध्या काय करत आहे याचा पाढाच त्यांनी वाचला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही बोट केले आहे.
दोन भाऊ एकत्र आले आहेत. त्यानंतर संपूर्ण मराठी माणसांना आनंद झाला आहे. ते लोकं आमच्या जास्त जवळ आले आहेत. अख्खं मुंबई महाराष्ट्र एकवटलं आहे. सध्या पैशाच्या जिवावर निवडणुका लढवल्या जात आहेत. उमेदवार विकत घेतले जात आहेत. काही ठिकाणी तर धमकावलं जात आहे. खून पाडले जात आहेत. त्या विरोधात लोकांच्या मनात एक राग तयार झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत हा राग नक्की दिसेल असं ही अमित ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी दुबार मतदारांचा प्रश्न ही मांडला. ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा दारूण पराभव झाला. त्यामुळे विधानसभेत अशी स्थिती होवू नये म्हणून त्यांनीच 40 लाख दुबार मतदार महाराष्ट्रात आणले असा आरोप अमित ठाकरे यांनी केला. त्याचा फायदा त्यांना विधानसभेला झाला. लोकसभा हारल्यानंतर त्यांनी हे केलं असा आरोप ही त्यांनी केला.
पण आता महापालिका निवडणुकीत त्यांचा हा खेळ चालणार नाही. या दुबार मतदारां विरोधात मनसेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. बोगस वोटींगसाठी जे येतील. जे दुबार मतदार असतील त्यांची व्यवस्थित व्यवस्था आम्ही करणार असं ही ते म्हणाले. या दुबार बोगस मतदारांची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. मतदाना दिवशी जर कोणी दुबार किंवा बोगस मतदार बुथवर दिसला तर त्याला तिथेच मारणार म्हणजे मारणारच अशी धमकी अमित ठाकरे यांनी दिली आहे. बोगस मतदान करून ही लोकं अनधिकृत गोष्टी करत आहेत. हे लोक दुसऱ्या राज्यातून येतात आणि इथं मतदान करतात. हे आम्ही होवू देणार नाही असं ही ते म्हणाले. या गोष्टी आम्ही पुराव्यासह निवडणूक आयुक्तांना सांगितल्या होत्या. पण त्यांनी ही गोष्ट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ढकलली होती. सर्व मोठ्या नेत्यांनी पुरावे दिले. तरी ही आयोगाने ऐकले नाही. म्हणजे यांच्यावर दबाव कोणाचा आहे हे पाहा असं ही ते यावेळी म्हणाले.
पण आता आम्हीच अलर्ट राहाणार आहोत. आम्ही सर्व दुबार मतदारांची माहिती गोळा केली आहे. मतदाना दिवशी हे लोक दिसले की त्यांना तिथेच फटकवणार. दिसला की फटकवणार हे आमचे ठरले असल्याचं ही त्यांनी सांगितलं. बाहेरून येणार, तिथेही मतदान करणार, इथं ही मतदान करणार हे चालू देणार नाही. हे सध्या सुरू आहे. पण आम्ही ते चालू देणार नाही. मतदाना दिवशी अशा बोगस आणि दुबार दोन- तिन लोकांना चोपल्या शिवाय बाकीचे सरळ होणार नाहीत. चोप भेटतोय हे समजल्यावर इतर दुबार आणि बोगस मतदार घरातूनच खाली उतरणारच नाही. ते त्यांच्या राज्यात निघून जातील असं ही अमित ठाकरे यावेळी म्हणाले. जो नडणार त्याला फोडणार असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. जो मराठीचा आदर करेल त्याला कोण कशाला मारेल. असं ही ते म्हणाले. त्यामुळे मुंबईत मराठी आणि मराठी माणसाचा सन्मान ठेवा असं ही ते म्हणाले.
उत्तर भारतीयांची मते मनसेला मिळणार का? या प्रश्नाचे ही उत्तर अमित यांनी दिले. ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडीओ पाहीला. तो उत्तर भारतीय तरूणाचा होता. तो मुंबई आला होता. तो म्हणत होता मुंबई मराठी बोललीच पाहीजे. त्यांची भाषा समजावून घेतली पाहीजे. मराठीचा सन्मान झालाच पाहीजे. हीच भावना प्रत्येकाची आहे असं अमित म्हणाले. आम्ही काही लगेच फाडफाड मराठी बोला असं कोणाला सांगत नाही. पण मराठी शिका. ती समजवून घ्या. मराठीचा सन्मान करा. जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला कशाला कोण मारेल असं ही अमित यावेळी म्हणाले. पण जर अरेरावी कराला. मराठीचा अपमान कराल तर मनसेचा चाबूक चालणारच असंही त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world