- मुंबई महापालिकेच्या प्रचार सभेत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली
- शिंदे म्हणाले की लोकांना भावनेपेक्षा विकासाचे राजकारण पाहिजे
- मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होईल आणि तो ही मराठी होईल असं शिंदे म्हणाले.
Eknath Shinde: मुंबई महापालिकेच्या (BMC Election 2026) प्रचाराची महायुतीची सभा शिवाजी पार्कवर पार पडली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला. ही सभा परिवर्तनाची नांदी आहे असं ते म्हणाले. काल इथं सभा झाली. त्यात शिव्याशाप, टोमणे,टीका करून ते गेले. आता त्याची आम्हाला आणि तुम्हाला ही सवय झालीय. त्यांच्याकडे मुद्देच नाहीत. त्यामुळे ते तसचं बोलतात. ही सभा कुणाला उत्तर देण्यासाठी नाही असं यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केलं. गेल्या तीन वर्षात आम्ही काय काम केलं. पाच वर्षात काय काम करणार आहेत हे सांगणारी ही सभा आहे असं त्यांनी सांगितलं. आपण कधी टीकेला टीकेने उत्तर दिलं नाही. आरोपाला कामातून उत्तर दिलं असं म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केला.
लोकांना भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण अपेक्षित आहे. विकसीत भारत, विकसीत महाराष्ट्र आणि विकसीत मुंबई हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ती जबबदारी आम्ही घेतली आहे. मुंबई आर्थिक राजधानी असली पाहीजे आणि दिसली पाहिजे. या पुढे फक्त विकास विकास आणि विकास हाच अजेंडा असेल असं ही ते म्हणाले.काही लोकांना निवडणूक आली की मराठी माणसाची आठवण येते. येरवी त्यांच्याकडे ते ढुंकून ही पाहात नाहीत. त्यांना मराठीसाठी काय करावं असं वाटत नाही. दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स हाच त्यांचा इंटरेस्ट आहे असा टोला त्यांनी लगावला. पाच साल घर में, चुनाव आया तो मुंबई खतरे मै. असं ही ते ठाकरे बंधूबाबत बोलले.
मुंबई काय रेल्वेचा डबा आहे का? कुठे ही काढला आणि कुठेही जोडला असं होतं का असं ही ते म्हणाले. मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात तुमच्यामुळे आलं. मुंबई महापालिकेत 25 वर्ष तुमची सत्ता होती. सत्तेत असताना तुम्ही मुंबईसाठी, मराठी माणसासाठी काय केलं सांगा असं आव्हान शिंदेंनी दिलं. मराठी माणसाची ही शेवटची लढाई आहे असं इमोश्नल भाषण इथं केलं. पण मराठी माणसाचं अस्तित्व कधीच धोक्यात नव्हतं, नसेल, आणि कधीच धोक्यात राहाणार नाही. पण तुमचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. तुमचं राजकारण धोक्यात आलं आहे. परंतू मराठी माणसाचं हित, मुंबईचं हित जपायला आम्ही समर्थ आहोत असा हल्लाबोलच शिंदे यांनी यावेळी केला.
मराठी माणूस आमच्या सोबत आहे. एकनाथ शिंदे मराठी नाही का? देवेंद्र फडणवीस मराठी नाहीत का? मराठीसाठी तुम्ही काय केलं? मुंबईतल्या मराठी माणसाचं महत्व कधी कमी होणार नाही असं शिंदे यांनी ठणकावून सांगितलं. मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार. तो मराठीच असेल अशी घोषणा ही यावेळी शिंदे यांनी केली. मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं ही ते यावेळी म्हणाले. मुंबईकर यांच्यामुळेच मुंबईच्या बाहेर गेला असा आरोप ही यावेळी शिंदे यांनी केला. वसई विरार पर्यंत मराठी माणूस कुणामुळे फेकला गेला असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. पण मराठी माणसाची काळजी करू नका त्यासाठी आम्ही समर्थ आहोत असं ही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world