जाहिरात

मुंबई महापालिकेच्या मतमोजणीत 'पाडू' गेमचेंजर ठरणार? ठाकरेंच्या आरोपानंतर आयोगाचं स्पष्टीकरण, वाचा सर्व माहिती

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी एक नवा वाद सुरु झाला आहे. या वादावर आयोगानं स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई महापालिकेच्या मतमोजणीत 'पाडू' गेमचेंजर ठरणार? ठाकरेंच्या आरोपानंतर आयोगाचं स्पष्टीकरण, वाचा सर्व माहिती
मुंबई:

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता काही तास शिल्लक आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीपूर्वी एक वाद सुरु झाला आहे. या वादाचे कारण म्हणजे मतमोजणी दरम्यान वापरले जाणारे पाडू म्हणजेच प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट हे यंत्र. या यंत्रावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच, राज्य निवडणूक आयोगाने यावर महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. 

मतमोजणी करताना केवळ तांत्रिक अडचण उद्भवली तरच या यंत्राचा वापर केला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले असून त्याचा सरसकट वापर होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगानं काय सांगितलं?

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची मतदान यंत्रे वापरली जात आहेत. ही यंत्रे भारत निवडणूक आयोगाची असून ती एम3ए प्रकारातील प्रगत यंत्रे आहेत. या यंत्रांमधील मतमोजणी ही प्रामुख्याने कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनच केली जाते. 

मात्र, एखाद्या वेळी मतमोजणी करताना काही तांत्रिक बिघाड झाला किंवा निकाल बघताना अडचण आली, तरच अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत पाडू यंत्राची मदत घेतली जाईल. हे यंत्र सर्वच ठिकाणी वापरले जाणार नाही, हे आयोगाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

( नक्की वाचा : ZP Election 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा, वाचा A to Z माहिती एका क्लिकवर )

कसा होणार वापर?

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील निवडणुकीसाठी एकूण 140 पाडू यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जर एखाद्या केंद्रावर या यंत्राची गरज भासलीच, तर त्याचा वापर केवळ बेल कंपनीच्या अधिकृत तंत्रज्ञांच्या उपस्थितीतच केला जाणार आहे. 

यंत्राच्या कार्यपद्धतीबाबत कोणतीही शंका राहू नये म्हणून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेने विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून हे यंत्र नेमके कसे काम करते, याचे डेमो देखील दिले आहेत.

राज ठाकरेंचा यंत्रणेवर संशय

पाडू यंत्राच्या वापराबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र शंका उपस्थित केली होती. हे मशीन नेमके काय आहे आणि ते कसे काम करते, हे कोणत्याही राजकीय पक्षाला नीट समजावून सांगण्यात आलेले नाही, असा आरोप त्यांनी केला होता. 

आयोगाने या यंत्राबाबत पारदर्शकता पाळली नसल्याचे त्यांचा दावा होता. या यंत्राच्या वापरामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता राहील का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्यामुळे या विषयावर मोठी चर्चा सुरू झाली होती.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे पत्र

केवळ राज ठाकरेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षानेही या यंत्राबाबत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. त्यांनी आयोगाला पत्र लिहून या नवीन यंत्रणेबाबत स्पष्टीकरण मागितले होते. या मशीनमुळे मतदानाच्या निकालात कोणत्याही प्रकारची गडबड होणार नाही, याची खात्री कशी मिळणार, असा सवाल त्यांच्याकडून विचारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आयोगाने आता केवळ तांत्रिक अडचणीच्या वेळीच याचा वापर होईल असे सांगून परिस्थिती स्पष्ट केली आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com