जाहिरात

BMC Election Result Exit Poll : बीएमसीचा 'किंग' कोण? भाजपची मुसंडी की ठाकरेंचा गड कायम; पाहा एक्झिट पोलचे आकडे

BMC Election Result Exit Poll Live Updates: मुंबई महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम संपला असून आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.

BMC Election Result Exit Poll : बीएमसीचा 'किंग' कोण? भाजपची मुसंडी की ठाकरेंचा गड कायम; पाहा एक्झिट पोलचे आकडे
BMC Election Result Exit Poll : मतदानानंतर एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर झाली आहे.
मुंबई:

BMC Election Result Exit Poll Live Updates: मुंबई महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम संपला असून आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान पार पडल्यानंतर ॲक्सिस माय इंडियाने आपला एक्झिट पोल जाहीर केला आहे. या अंदाजानुसार मुंबईत भाजप+ आघाडीचे पारडे जड दिसत असून सत्तेचे समीकरण कोणाकडे झुकणार याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सुमारे 22,758 मतदारांशी संवाद साधून हा कौल तयार करण्यात आला असून, त्यातील महत्त्वाचे 10 मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

भाजपा आघाडीचं स्पष्ट बहुमत

ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार महायुतीचं मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमत येणार आहे. भाजपा-शिवसेना महायुतीला 131 ते 151 जागा मिळतील असा या पोलचा अंदाज आहे. तर शिवसेना-मनसे युतीनं 58-68 जागा मिळतील. काँग्रेसला 12 ते 16 तर अन्य पक्षांना 6 ते 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

भाजप+ आघाडीचे मुंबईवर वर्चस्व

ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, मुंबईत भाजप+ आघाडी सर्वात मोठी शक्ती म्हणून उदयास येताना दिसत आहे. मतदारांच्या लिंगभेदानुसार विचार केला तर पुरुष मतदारांपैकी 40% लोकांनी भाजप+ ला पसंती दिली आहे, तर महिला मतदारांमध्ये हा आकडा आणखी जास्त म्हणजे 44% इतका आहे. या आकडेवारीवरून मुंबईत महायुतीची पकड मजबूत असल्याचे दिसून येते.

( नक्की वाचा : BMC Election 2026 : '....अन्यथा आडनाव बदलावं लागेल' शेलारांचा ठाकरेंवर प्रहार! 'रशियन तेला'चा काढला चिमटा )

मराठी मतदारांचा कौल कोणाकडे?

मुंबईच्या राजकारणात नेहमीच निर्णायक ठरणाऱ्या मराठी मतदारांनी संमिश्र कल दिला आहे. भाजप+ आघाडीला 30% मराठी मते मिळताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला (UBT+) मराठी मतदारांनी मोठा पाठिंबा दिला असून ही टक्केवारी 49% इतकी आहे. यामुळे मराठी हृदयसम्राट कोण? यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

महिला मतदारांची भाजपला पसंती

या निवडणुकीत महिला मतदारांनी भाजप+ आघाडीवर मोठा विश्वास दर्शवला आहे. सुमारे 44% महिलांनी या आघाडीला मतदान केल्याचा अंदाज आहे. त्यापाठोपाठ UBT+ गटाला 31% आणि काँग्रेस+ ला 13% महिला मतदारांची पसंती मिळाली आहे. महिलांच्या या पाठिंब्यामुळे निकालात मोठे फेरबदल होऊ शकतात.

समुदाय निहाय मतदानाची टक्केवारी

मुंबईतील विविध समुदायांनी आपापल्या पसंतीनुसार मतदान केले आहे. यामध्ये उत्तर भारतीयांनी 68% मते भाजप+ ला दिली आहेत. गुजराती आणि राजस्थानी मतदारांमध्ये भाजप+ ची लाट असून त्यांना 69% मते मिळत आहेत. दक्षिण भारतीय मतदारांपैकी सुद्धा 61% लोकांनी भाजप+ ला पसंती दिली आहे.

( नक्की वाचा : BMC Election Result Exit Poll मुंबईत 'महायुती'चाच बोलबाला; ठाकरे युतीचा प्रयोग फसला, वाचा सर्व एक्झिट पोलचा एकत्र निकाल )

अल्पसंख्याक मतदारांचा कल

अल्पसंख्याक समुदायाचा विचार केला तर मुस्लिम मतदारांमध्ये काँग्रेस+ 41% आणि UBT+ 29% असा प्रभाव पाहायला मिळत आहे. ख्रिश्चन समुदायामध्ये काँग्रेस+ ला 29% तर भाजप+ ला 12% मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आकडेवारीवरून अल्पसंख्याक मते प्रामुख्याने महाविकास आघाडीकडे वळल्याचे दिसते.

तरुण आणि ज्येष्ठ मतदारांचे मत

वयोगटानुसार मतदारांच्या आवडीनिवडी बदललेल्या दिसत आहेत. 18-25 years या वयोगटातील 47% तरुणांनी भाजप+ ला पसंती दिली आहे. याउलट, 61 & above म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये उद्धव ठाकरे गटाचा प्रभाव जास्त असून त्यांना 39% तर भाजप+ ला 36% मते मिळण्याचा अंदाज आहे.

राहणीमानानुसार मतदानाचे समीकरण

मुंबईत तुम्ही कुठे राहता, याचा परिणाम तुमच्या मतदानावर झाल्याचे दिसते. इमारतींमध्ये राहणाऱ्या 51% लोकांनी भाजप+ ला पसंती दिली आहे. चाळींमध्ये राहणाऱ्या मतदारांमध्ये भाजप+ आणि UBT+ यांच्यात प्रत्येकी 33% मतांसह काट्याची टक्कर आहे. तर झोपडपट्टी भागात UBT+ ला 35% आणि भाजप+ ला 40% मते मिळताना दिसत आहेत.

व्यवसायानुसार मतदारांची पसंती

नोकरी-व्यवसायानुसार कल पाहिला तर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये UBT+ गट 39% मतांसह आघाडीवर आहे. विद्यार्थ्यांमध्ये भाजप+ ला 45% तर UBT+ ला 35% पसंती मिळाली आहे. तसेच घरातील कामाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गृहिणींमध्ये भाजप+ कडे 44% कल दिसून येत आहे.

मुंबईकरांच्या पाच प्रमुख समस्या

निवडणुकीत मतदारांनी नागरी सुविधांना केंद्रस्थानी ठेवले होते. यामध्ये ड्रेनेज आणि पुराची समस्या (31%) ही सर्वात मोठी समस्या ठरली. त्यापाठोपाठ स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन (20%), पिण्याच्या पाण्याचा प्रश्न (18%), रस्त्यांची दुरवस्था (17%) आणि वाढलेली वीज बिले (16%) या मुद्द्यांवर मुंबईकरांनी आपले मत मांडले आहे.

सर्वेक्षणाची व्याप्ती आणि एकूण कल

ॲक्सिस माय इंडियाने हे सर्वेक्षण अत्यंत व्यापक स्तरावर केले आहे. यामध्ये 57% मतदार हे चाळीत राहणारे, 29% इमारतींमधील आणि 14% झोपडपट्ट्यांमधील आहेत. या सर्वांच्या एकत्रित कौलाचा विचार केला तर मुंबई महानगरपालिकेत भाजप+ आघाडी सत्तेच्या सिंहासनापर्यंत सहज पोहोचेल, असे चित्र सध्या दिसत आहे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com