BMC Election 2026 : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान पार पडत असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. मतदानाच्या दिवशीच बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मात्र, या आरोपांना भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरेंच्या या भूमिकेवर टीका करताना शेलार यांनी ठाकरे बंधू हे रडके असल्याची बोचरी टीका केली असून हे सर्व केवळ राजकीय नाटक असल्याचा दावा केला आहे.
काय म्हणाले शेलार?
उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा समाचार घेताना आशिष शेलार म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता सल्लागार सडके आणि ठाकरे बंधू रडके असे चित्र दिसत आहे. उद्धव ठाकरे एखाद्या सराईताप्रमाणे निवडणुकीच्या दिवशी पत्रकार परिषद घेत आहेत.
मुळात त्यांना अशा प्रकारे पत्रकार परिषद घेण्याची परवानगी मिळाली आहे का आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप आचारसंहितेचा भंग ठरत नाहीत का, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. लोकशाहीच्या उत्सवात अडमुठेपणा करण्यापेक्षा यंत्रणेवर विश्वास ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : BMC Election 2026: मार्कर वापरण्यास याच वर्षापासून सुरू झाली? 'NDTV मराठी'चे Fact Check )
शेलार यांनी व्यक्त केला संशय
मतदानाची शाई पुसली जात असल्याच्या दाव्यावर शेलार यांनी संशय व्यक्त केला आहे. ज्याने कुणी शाई पुसण्याचा प्रयत्न केला, त्याचा हेतू गुन्हेगारी स्वरूपाचा असू शकतो. शाई पुसण्यापूर्वी बोटावर तेल लावले होते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ज्यांना दुबार मतदान करायचे आहे, तेच अशा प्रकारे शाई पुसण्याचे प्रकार करू शकतात. त्यामुळे ज्याने शाई पुसली आहे, त्याच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. रशियावरून तेल आणले आहे का, असा टोला लगावत त्यांनी ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांच्या शाईबद्दल शंका उपस्थित केली.
( नक्की वाचा : Akshay Kumar :'बाबांवर खूप कर्ज आहे,वाचवा;' मतदानकेंद्राबाहेर अक्षय कुमारकडे फॅन्सची आर्त हाक, काय घडलं, VIDEO )
'राजकीय मेंदूत केमिकल लोचा'
शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या आजवरच्या आरोपांची यादीच वाचून दाखवली. आधी मतचोरीचा आरोप झाला, मग मतदार यादीतील नावांची चोरी, दुबार मतदान, मतदान यंत्रातील बिघाड आणि अधिकाऱ्यांच्या निवडीतही चोरी झाल्याचे आरोप करण्यात आले. आता थेट शाईवर आरोप केले जात आहेत.
हे सर्व पाहता ठाकरेंच्या राजकीय मेंदूत केमिकल लोचा झाला असून ही केवळ बुद्धीतील हेराफेरी आहे, अशी टीका शेलार यांनी केली. हवेत गोळीबार करणे आणि कथानके तयार करणे थांबवावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
राज ठाकरेंनाही टोला
निवडणूक आयोगाकडे कोणतीही अधिकृत तक्रार न करता थेट पत्रकार परिषद घेऊन आरोप करणे हा केवळ प्रचाराचा भाग असल्याचे शेलार म्हणाले. मुंबईकर नागरिक अशा रडक्या लोकांच्या मागे जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली. राज ठाकरेंना हे आधी सुचले नाही का, असा सवाल त्यांनी केला. लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन करतानाच त्यांनी विरोधकांना रडण्याची सवय सोडण्याचा सल्ला दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world