जाहिरात

BMC Election Result Exit Poll : बीएमसी एक्झिट पोलमध्ये भाजपची 'दौड'; ठाकरे आणि काँग्रेससाठी काय आहे Good News

BMC Election Result Exit Poll Live Updates: एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, भाजपला मायानगरीत मोठे यश मिळताना दिसत आहे, तर ठाकरे गटाला मराठी मतदारांनी मोठी साथ दिल्याचे चित्र आहे.

BMC Election Result Exit Poll : बीएमसी एक्झिट पोलमध्ये भाजपची 'दौड'; ठाकरे आणि काँग्रेससाठी काय आहे Good News
BMC Election Result Exit : मुंबई महापालिकेच्या एक्झिट पोलमध्ये ठाकरे आणि काँग्रेससाठीही गुड न्यूज आहे.
मुंबई:

BMC Election Result Exit Poll Live Updates: मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीनंतर आता सर्वांचे डोळे निकालाकडे लागले आहेत. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले असून यामध्ये मुंबईचा नवा राजा कोण असेल, याचे चित्र काहीसे स्पष्ट होताना दिसत आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएमसीवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला होता. सध्याच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, भाजपला मायानगरीत मोठे यश मिळताना दिसत आहे, तर ठाकरे गटाला मराठी मतदारांनी मोठी साथ दिल्याचे चित्र आहे.

बीएमसीमध्ये बहुमताचे समीकरण

मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागांसाठी मतदान झाले असून बहुमतासाठी 114 हा आकडा गाठणे आवश्यक आहे. जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला तब्बल 138 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला 59 जागांवर समाधान मानावे लागू शकते. 

काँग्रेसच्या पदरात केवळ 23 जागा पडतील असे या पोलमध्ये म्हटले आहे. जनमत पोलच्या आकडेवारीनुसारही भाजप-शिवसेना युतीला 138 जागा मिळण्याची शक्यता असून ठाकरे गट, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळून 62 जागा मिळू शकतात. सकाळच्या पोलमध्ये भाजप-शिवसेना युतीला 119 तर ठाकरे गटाला 75 जागा मिळतील असा अंदाज आहे.

( नक्की वाचा : BMC Election Result Exit Poll : बीएमसीचा 'किंग' कोण? भाजपची मुसंडी की ठाकरेंचा गड कायम; पाहा एक्झिट पोलचे आकडे )

ठाकरे गटासाठी दिलासादायक बाब

एक्झिट पोलच्या आकड्यांचे सखोल विश्लेषण केले असता, उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक सकारात्मक बाजू समोर आली आहे. मुंबईतील मराठी माणूस अजूनही मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाच्या पाठीशी उभा असल्याचे दिसत आहे. 

एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार, तब्बल 49 टक्के मराठी मते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. या तुलनेत भाजपला 30 टक्के आणि काँग्रेसला 8 टक्के मराठी मते मिळताना दिसत आहेत. याशिवाय 35 टक्के विद्यार्थी, 33 टक्के मजूर वर्ग आणि 32 टक्के ऑटो रिक्षा चालक यांनीही उद्धव ठाकरे यांना पसंती दिल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

( नक्की वाचा : BMC Election Result Exit Poll मुंबईत 'महायुती'चाच बोलबाला; ठाकरे युतीचा प्रयोग फसला, एक्झिट पोलचा धक्कादायक कल )

भाजपाच्या विजयाचे गणित

मराठी मतांचा कौल ठाकरेंकडे असला तरी, इतर प्रांतीय मतदारांनी भाजपच्या झोळीत भरभरून दान टाकल्याचे पोल सांगत आहेत. मुंबईतील उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतदारांचा कल भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडे सर्वाधिक राहिला आहे. 

पोलनुसार, 68 टक्के उत्तर भारतीय आणि 61 टक्के दक्षिण भारतीय मतदारांनी भाजप युतीला मतदान केले आहे. तसेच 69 टक्के गुजराती आणि राजस्थानी मतेही भाजपच्या बाजूने गेल्याचे दिसते. इतर मतदारांपैकीही 66 टक्के मते भाजपला मिळण्याचा अंदाज असल्याने भाजपा बहुमताच्या जवळ पोहोचताना दिसत आहे.

मुस्लीम मतदारांची काँग्रेसला साथ

मुंबईत काँग्रेसची कामगिरी फारशी उत्साहवर्धक नसली तरी त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एक्झिट पोलनुसार, मुंबईतील मुस्लीम मतदारांनी काँग्रेसवर सर्वाधिक विश्वास दाखवला आहे. सुमारे 41 टक्के मुस्लिम मते काँग्रेसच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. 

याच गटात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 28 टक्के आणि भाजप युतीला 12 टक्के मते मिळतील असा अंदाज एक्सिस माई इंडियाने व्यक्त केला आहे. एकूणच, यावेळच्या निवडणुकीत मुंबईच्या प्रत्येक प्रभागातील जातीय आणि प्रांतीय समीकरणांनी निकालात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसून येत आहे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com