BMC Election Result Exit Poll Live Updates: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वांचं लक्ष निकालाकडे लागले आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध वृत्तवाह्या आणि संस्थांचे एक्झिट पोल समोर आले असून, या आकडेवारीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या सर्व एक्झिट पोलचा कल पाहता मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आपल्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेशी हातमिळवणी करून मराठी अस्मितेचे आणि भावनिक कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एक्झिट पोलची आकडेवारी पाहता मतदारांनी या युतीला फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याचे चित्र आहे. मुंबईच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा महायुतीच्या हाती जाण्याचे संकेत या एक्झिट पोलमधून मिळत आहेत.
साम टीव्ही आणि सकाळ Exit Poll
साम टीव्ही आणि सकाळच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. या पोलने भाजपला 84 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 35 जागा मिळतील असे म्हटले आहे. काँग्रेसला केवळ 20 जागा मिळताना दिसत असून, मनसेला 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळतील असा प्राथमिक अंदाज या पोलमधून समोर आला आहे.
( नक्की वाचा : BMC Election Result Exit Poll : बीएमसीचा 'किंग' कोण? भाजपची मुसंडी की ठाकरेंचा गड कायम; पाहा एक्झिट पोलचे आकडे )
जेव्हीसी Exit Poll
जेव्हीसी पोलच्या आकडेवारीनुसार महायुतीने बहुमताचा आकडा सहज पार केला आहे. महायुतीला 129 ते 146 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या युतीला मोठा फटका बसताना दिसतोय. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 21 ते 25 जागा मिळण्याची शक्यता असून इतर उमेदवारांच्या खात्यात 6 ते 9 जागा जाऊ शकतात. या पोलने महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.
एक्सिस माय इंडिया Exit Poll
एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने महायुतीसाठी अत्यंत दिलासादायक चित्र रंगवले आहे. या पोलनुसार भाजप आणि शिवसेना महायुतीला 131 ते 151 जागा मिळण्याची शक्यता आहे. हे आकडे मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमत दर्शवतात. याउलट ठाकरे बंधू आणि शरद पवार यांच्या युतीला केवळ 58 ते 68 जागांवर रोखले जाण्याचा अंदाज आहे. काँग्रेस आणि वंचितला 12 ते 16 जागा तर इतरांना 6 ते 12 जागा मिळतील असे या पोलमध्ये नमूद करण्यात आले आहे.
( नक्की वाचा : Exit Poll म्हणजे काय? तो कसा करतात? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं )
प्रजा पोल ॲनालिटीक्स Exit Poll
प्रजा पोल ॲनालिटीक्सच्या अंदाजानुसार महायुती मुंबईत एकतर्फी विजय मिळवताना दिसत आहे. या पोलने महायुतीला 146 जागांचे स्पष्ट बहुमत दिले आहे. तर ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ 53 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. काँग्रेस आणि वंचित आघाडीला 15 जागा तर अपक्ष आणि इतर पक्षांना 13 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, या पोलने ठाकरेंच्या वर्चस्वाला मोठा तडा जाण्याचे संकेत दिले आहेत.
BMC Election Result Exit Poll of Polls
सर्व एक्झिट पोलचा एकत्रित विचार करता म्हणजेच पोल ऑफ पोल्समध्ये महायुतीचे पारडे जड असल्याचे स्पष्ट झाले आहे. बहुतेक सर्वच एक्झिट पोलमध्ये महायुतीला 130 पेक्षा जास्त जागा मिळत असून, त्यांनी बहुमतासाठी आवश्यक असलेला 114 हा आकडा सहज ओलांडलेला दिसतो. मुंबई महापालिकेत गेली अनेक वर्षे असलेले ठाकरेंचे वर्चस्व आता धोक्यात आले असून, भाजपने आपली ताकद मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. मराठी कार्ड आणि ठाकरे बंधूंची युती मतदारांना आकर्षित करण्यात कमी पडल्याचे या आकडेवारीवरून तरी स्पष्ट होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world