छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या महायुतीच उमेदवार संदीपान भुमरे यांनी बुधवारी वेरुळ येथे श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराजांची भेट घेतली. जय बाबाजी भक्त परिवाराचा पाठिंबा मिळावा, अशी विनंती देखील केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जय बाबाजी भक्त परिवाराची राजकीयदृष्ट्या निर्णय घेण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक बुधवारी आयोजित केली होती. या निमित्ताने श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांची श्री क्षेत्र वेरूळ येथे उपस्थिती होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महायुतीचे उमेदवार संदिपानजी भुमरे, विद्यमान खासदार इम्तियाज जलील, अपक्ष उमेदवार डॉ. जीवन राजपूत, अपक्ष उमेदवार जेके जाधव, अपक्ष उमेदवार संजय शिरसाट व शिर्डी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भारत संभाजी भोसले या सर्वांनी बाबाजींचे आशीर्वाद घेतले. तसेच निवडणुकीत आपले आशीर्वाद मिळावे, अशी विनंती देखील केली.
(नक्की वाचा- नरेश म्हस्केंची ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शाखेत अचानक एन्ट्री, पुढे काय झालं? VIDEO)
10 मे रोजी निर्णय जाहीर करणार
भक्त परिवाराच्या आज झालेल्या बैठकीमध्ये मतदारसंघांमध्ये पाठिंबा देण्यासंदर्भाचे निर्णय अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 10 मे रोजी घेणार असल्याचं ठरले आहे. तो निर्णय सर्व प्रसिद्धी माध्यमांना अधिकृतपणे कळवण्यात येईल. आज कुठल्याही उमेदवारासंदर्भात पाठिंबाचा निर्णय झालेला नाही, असे जय बाबाजी भक्त परिवाराचे वतीने राजकीय समितीचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी सांगितले.
( नक्की वाचा - मतदान केलं अन् मिळाली हिऱ्याची अंगठी, नेमकं काय घडलं?)
शांतिगिरी महाराजांचा सात लोकसभा मतदारसंघात भक्त परिवार
शांतिगिरी महाराज यांना नाशिकमधून महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान शांतिगिरी महाराज यांचा राज्यातील सात लोकसभा मतदारसंघात भक्त परिवार आहे. तर दिंडोरी, जळगाव आणि संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराज यांचा मोठा भक्त परिवार आहे. त्यामुळे शांतिगिरी महाराज यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्न करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world