जाहिरात

बंडखोराची समजूत काढायला अजितदादा थेट बंगल्यावर गेले, बंडखोराने शेवटी काय केले?

नाना काटे कार्यकर्त्यां बरोबर बोलून निर्णय घेणार आहे. मात्र नाना उमेदवारी मागे घेतील असा विश्वास यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला.

बंडखोराची समजूत काढायला अजितदादा थेट बंगल्यावर गेले, बंडखोराने शेवटी काय केले?
पुणे:

सुरज कसबे 

विधानसभा निवडणुकीत मतदार संघ न सुटल्याने अनेक इच्छुकांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली आहे. सर्वच राजकीय पक्षांना या बंडखोरांचा सामना करावा लागत आहे. आता या बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच प्रयत्न आता उपमुख्यमंत्री अजित पवारही करत आहेत. चिंचवड मतदार संघ हा महायुतीत भाजपला सुटला आहे. तिथून भाजपने शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नाराज झाले आहेत. काहींनी थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणे पसंत केले तर अजित पवारांचे जवळचे म्हणून ओळखले जाणारे नाना काटे यांनी बंडखोरी करणे पसंत केले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी अजित पवारांना त्यांचे निवासस्थान गाठावे लागले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नाना काटे हे चिंचवडमधील राष्ट्रवादीचे बडे नेते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली. विधानसभा निवडणुकीत आपल्याला चिंचवड मतदार संघातून उमेदवारी मिळेल अशी त्यांना आपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. ही जागा भाजपला गेली. भाजपने शंकर जगताप यांना उमेदवारीही जाहीर केली. त्यानंतर नाना काटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी अजित पवारांनी नाना काटे यांची त्या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये बंद दाराआड अर्धातास चर्चाही झाली. 

ट्रेंडिंग बातमी - 'देवेंद्र तात्यांनीच मला सर्व शिकवलं' जरांगेंनी पुन्हा फडणवीसांना डिवचलं

चर्चा झाल्यानंतर अजित पवार तिथून निघून गेले.नाना काटे कार्यकर्त्यां बरोबर बोलून निर्णय घेणार आहे. मात्र नाना उमेदवारी मागे घेतील असा विश्वास यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला. त्यानंतर नाना काटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली. त्यात माजी नगरसेवक आणि पदाधिकाही होते. आपण निवडणूक लढवली पाहीजे असा सर्वांचा आग्रह होता असे नाना काटे यांनी सांगितले. त्यामुळे उमेदवारी मागे घेणार नाही. निवडणूक आपण लढणारच असेही नाना काटे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यामतदार संघात तिरंगी लढत होणार हे आता जवळपास स्पष्ट आहे.      

ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश

दरम्यान यावेळी बोलताना अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्या बाबत आपण केलेले वक्तव्य हे राजकीय हेतूने केलं नव्हतं असं स्पष्ट केले. आपल्या बुद्धीला जे पटलं ते आपण बोललो असं त्यांनी सांगितला. आर. आर. पाटील यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर  पडदा टाकण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. तर यंदाच्या दिवाळीत पवार कुटुंब बारामतीत एकत्र दिसतील का या प्रश्नावर  अजित पवार यांनी ते तुम्हाला दिसेल असं सांगत, यावर स्पष्ट बोलणं मात्र टाळलं आहे.