जाहिरात
This Article is From Apr 16, 2024

विजयाची निश्चिती असो की नेत्यांची नाराजी, महायुतीची सर्व मदार फडणवीसांवरच

विजयाची निश्चिती असो की नेत्यांची नाराजी, महायुतीची सर्व मदार फडणवीसांवरच
मुंबई:

सागर कुलकर्णी 

राज्यात लोकसभा निवडणुकांचा हंगाम जोरदार सुरु आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगतोय. प्रत्येक मतदारसंघ महत्त्वाचा आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटावर अस्तित्त्व राखण्याची वेळ आलीये. त्यामुळे एकाच लोकसभा मतदारसंघात 2-3 सभा घेणं आलंच. महायुतीने आपल्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केलीये. मात्र या सगळ्यात मार्केट आलंय ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाला.  महायुतीत तीन पक्ष आहेत. भाजपसोबत शिंदे गट आणि अजित पवार गटातील उमेदवारांनाही फडणवीसांच्या सभा हव्या आहेत. देवेंद्र फडणवीसांची सभा मिळाली की विजय निश्चित होतो, अशी भावना महायुतीच्या उमेदवारांची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सभांना जितकी मागणी आहे, तितकीच मागणी फडणवीसांच्या सभांना दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातलं फडणवीसांचं महत्त्व अधोरेखित होत असल्याचं भाजप कार्यकर्ते सांगत आहेत. गेल्या काही दिवासांपासून दिल्लीच्या नेत्यांनी फडणवीसांचे पंख छाटल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, वास्तव परिस्थिती वेगळी असल्याचं दिसत आहे. विजयाची हमी देणारी सभा असो की उमेदवारांची नाराजी. सर्वच स्तरावर फडणवीसांच्या नावाला मार्केट आलंय.

फडणवीस 125 सभा घेतील
लोकसभा निवडणुका ह्या देशाचं भविष्य ठरवणाऱ्या असतात. केंद्रीय मुद्द्यांभोवती ही निवडणूक फिरते. त्यामुळे केंद्रीय नेत्यांना मागणी असते. त्यामुळे मोदी- शहा जोडीपैकी एकाची सभा उमेदवारांना हवी असते. अशात योगी आदित्यनाथांनीही राष्ट्रीय स्तरावर चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे त्यांच्याही नावाला जोरदार मागणी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांची वाढती मागणी त्यांची लोकप्रियता अधोरेखित करते. पुर्व विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला आहे. 15 एप्रिलपर्यंत फडणवीसांनी 16 सभा घेतल्या आहेत. प्रचाराला अजून दोन दिवसांचा वेळ आहे. यात आणखी सभांची भर पडू शकते. त्यामुळे फडणवीसांच्या सभांचा एकूण स्ट्राईकरेट इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्तीचा आहे. म्हणजेच फडणवीसांनी प्रत्येक टप्प्यात २० सभा घेतल्या, तरी त्यांच्या सभा हा १०० चा आकडा आरामात गाठू शकतो. कार्यकर्त्यांना मात्र १२५ ते १३० सभा फडणवीसांकडून अपेक्षित आहेत. फडणवीससुद्धा या दिशेनं प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळतंय. फडणवीसांच्या वाढत्या सभा त्यांची मतदारांमधील वाढती स्विकृती अधोरेखित करत असल्याचं कार्यकर्ते म्हणत आहेत. 

सोशल इंजिनिअरिंग फळाला
फडणवीस मास लिडर नसल्याची टीका वारंवार झाली. 2019 च्या लोकसभेत राष्ट्रवादी अविभक्त होती. तेव्हा शरद पवारांनी त्यांच्या जातीचा उल्लेख केला होता. फडणवीस हे केंद्राने लादलेले नेते आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्त्वाला मान्यता आणि लोकप्रियता मिळणार नसल्याचं बोललं गेलं होतं. यंदाची लोकसभा निवडणूक मात्र वेगळाच संदेश देताना दिसते. फडणवीसांच्या सभा भाजपसोबत सहकारी पक्ष असलेल्या शिंदे गट व अजित पवार गटालाही हव्या आहेत. हे शक्य झालंय फडणवीसांच्या सोशल इंजिनिअरिंगमुळे. मराठा आरक्षणाचा मुद्दा असो की ओबीसी आरक्षणाचा, फडणवीसांनी यातून मध्यमार्ग काढला. दोन्ही समाजाचा असंतोष सामंज्यस्यात बदलला. पुढं मायक्रो ओबीसी समाजांना महामंडळं दिली. अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर असं केलं. दिव्यांग बांधवांसाठी विशेष तरतुदी केल्या. दलित आणि आदिवासी प्रश्नांनाही फैलावर घेतले. त्यातूनही योग्य मार्ग काढले. फडणवीसांचं हेच सोशल इंजिनिअरिंग आता फळाला आल्याचं चित्रं आहे. राज्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याच प्रयत्न फडणवीसां केला होता. त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सर्वच वर्गांमध्ये फडणवीसांबद्दलची सरकारात्मक भावना तयार झाली आहे. त्याचं मतात रुपांतर करण्यासाठी फडणवीसांच्या सभा महत्त्वाच्या आहेत. असं मत महायुतीचे नेते व्यक्त करत आहेत. 

पवार- ठाकरेंना शह
राज्यात फडणवीस विरुद्ध पवार आणि ठाकरे असा सामना रंगतोय. या दोन्ही शक्तींना एकत्र टक्कर देण्यासाठी फडणवीसांनीही कंबर कसली आहे. परभणीचे उमेदवार महादेव जानकर पवारांच्या गळाला लागल्याचं चित्र होतं. यात फडणवीसांनी राजकीय कसब दाखवलं. जानकरांना आपल्याकडे खेचलं. अजित पवार गटाला सुटलेल्या जागेची उमदेवारी मिळवून दिली. इथं फडणवीसांनी पवारांना शह दिला. लगचेच पवारांनी उलटा डाव टाकला. माढ्यात मोहिते पाटलांना आपल्याकडे खेचलं. पवारांनी फडणवीसांच्या खेळीची परतफेड केल्याचं बोललं गेलं. दोघांमध्ये संघर्ष सुरु असताना ठाकरे मात्र फारसे अॅक्टिव्ह दिसत नाहीयेत. महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीत ही नाराजीनाट्य रंगतं आहे. मात्र ही नाराजी सोडवण्यासाठी सर्वांना 'सागर बंगला'च महत्त्वाचा वाटतो आहे. फडणवीसांच्या या निवासस्थानी चर्चेच्या अनेक मालिका पार पडतायेत. दिवसभर सभा आणि संध्याकाळी नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची वेळ फडणवीसांवर आलीये. महायुतीत जागा वाटपावरुन गोंधळ आहे. मात्र, कोणत्याही नेत्याने टोकाची भूमिका घेतली नाही. सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस शिवसेना भिडते आहे. मुंबईचंही चित्र तसंच आहे. हे घडत असताना महायुतीत शिस्त राखण्यासाठी फडणवीस यशस्वी ठरल्याचं चित्र आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com