मनोज सातवी, प्रतिनिधी
राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे.उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार (29 ऑक्टोबर) हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास आता वेग आला आहे. प्रमुख पक्षांचं जागा वाटपाचं कामही आता अंतिम टप्प्यात आलं आहे. दरवेळीप्रमाणे या निवडणुकीत देखील काही विद्यमान आमदारांचं तिकीट त्यांच्या पक्षानं कापलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे. त्यामुळे शिंदे यांच्या राजकीय भवितव्यासाठी निवडणूक निकालांना मोठं महत्त्व आहे.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं पालघर विधानसभा निवडणुकीत राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे यांनी उमेदवारी नाकारल्यानं विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना अश्रू अनावर झाले आहेत. मतदारसंघात मी चांगलं काम केलं. मी प्रत्येक वेळी गावित यांच्यासाठी तडजोड केली आहे. मला यंदा चांगली संधी आहे. त्यानंतरही मला उमेदवारी नाकारली आहे. माझ्या वडिलांपासून मी एकनिष्ठपणे काम केल्याचं हेच फळ आहे का? असा सवाल श्रीनिवास वनगा यांनी रडत-रडत विचारला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जीव देण्याच्या विचारात...
दरम्यान उमेदवारी नाकारल्यानं श्रीनिवास वनगा यांना नैराश्य आलंय. नैराश्यातून आत्महत्या करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, असा दावा त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी केला आहे. उद्धव ठाकरे देव माणूस मात्र एकनाथ शिंदे यांनी विश्वासघात केला, असा आरोप त्यांनी केला.
'माझे पती श्रीनिवास वनगा त्यांच्या पालघर विधानसभेत व्यवस्थित काम करत होते. त्यांनी कधी कामाची प्रसिद्धी केली नव्हती. उमेदवारी मिळण्यासाठी त्यांना आशा होती. मुलाचा वाढदिवस असूनही ते शिंदेसोबत सुरतला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला नाही.
( नक्की वाचा : सदा सरवणकरांचं ठरलं! मुख्यमंत्र्यांची परवानगी घेत जाहीर केला निर्णय )
ते (श्रीनिवास वनगा) बोलत नाही. त्यांची मनस्थिती नीट नाही. ते दोन दिवसांपासून जेवत नाही. शिंदे साहेबांनी 39 आमदारांचं पुनर्वसन केलं. माझ्या पतीचं काय चुकलं? असा सवाल त्यांनी विचारला. त्यांना नैराश्य आलंय. त्यांचं काही बरं वाईट झालं तर मी कुणाला जबाबदार धरु? ' असा प्रश्न सुमन वनगा यांनी माध्यमांशी बोलताना विचारला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world