योगेश लाठकर, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सोशल मीडिया असो की लाऊड स्पीकर वरील गाणे असो की अन्य मध्यम प्रत्येकाचा वापर करून प्रत्येक उमेदवाराचा हेतू मतदारापर्यंत आपली माहिती पोहोचवणे आहे. पण आपण बनवलेले गाणे दुसऱ्या उमेदवाराने चोरले म्हणून एका उमेदवार विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून दाखल झाला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला स्वतःची माहिती आकर्षक स्वरूपात मतदार राजापर्यंत पोहोचवायची आहे. त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेण्याचे काम उमेदवारांकडून सुरू आहे. मग हँडबील, पँम्पलेट, वर्तमानपत्रातील जाहिराती, सोशल मीडिया यांच्यासह ग्रामीण भागात रिक्षांवर साऊंड सिस्टीम लावून प्रचार सुरू आहे.
नक्की वाचा - विदेशी मानसिकतेच्या काँग्रेसकडून नेहमीच महाराष्ट्राचा द्वेष, पुण्यातील सभेत PM मोदींचा प्रहार
पण एका उमेदवाराने चक्क दुसऱ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने तयार केलेले गाणे कॉपी करून स्वतःच्या नावाने लावले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन्ही उमेदवारांच्या नाम साधर्म्यामुळे हा प्रकार करता आला. हा प्रकार एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या लक्षात आला. त्यामुळे प्रमोद एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहा पोलीस स्थानकात कॉपी गाणे रिक्षाच्या साऊंड सिस्टीमवरून विना परवाना वाजल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात आचार संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे. हा गुन्हा नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलीस स्थानकात दाखल आहे. हे प्रमोद एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावात केवळ साधर्म्य असून मुख्यमंत्र्यांचा या घटनेशी कुठलाही संबंध नाही.
कुठे घडला हा प्रकार?
लोहा विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. आशाबाई श्यामसुंदर शिंदे यांचे उमेदवार प्रतिनिधी प्रमोद एकनाथ शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी 88-लोहा यांना यासंदर्भात तक्रार दिली आहे. लोहा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या आशाबाई श्यामसुंदर शिंदे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याच नावाशी साधर्म्य असणाऱ्या अन्य अपक्ष महिला उमेदवार आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी शेकापच्या आशाबाई यांच्या प्रचार गीताची कॉपी केली असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये श्यामसुंदर शिंदे यांनी अपक्ष महिला उमेदवार आशाताई श्यामसुंदर शिंदे हे प्रचार गीत आणि आमचे नेते कै. भाई केशवराव धोंडगे, गुरुनाथ कुरुडे यांचे छायाचित्र प्रचारात वापरत असल्याचा आरोप केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world