जाहिरात

'नालायक खाते...' अजित पवारांच्या 'गुलाबी' खात्याला सहकाऱ्यानेच टोचले 'काटे'

शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांच्यानंतर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर टीका केली आहे.

'नालायक खाते...' अजित पवारांच्या 'गुलाबी' खात्याला सहकाऱ्यानेच टोचले 'काटे'
मुंबई:

अजित पवार आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमुळे महायुतीमधील त्यांचे मित्र पक्ष असलेले शिवसेना आणि भाजपचे नेते हे दिवसेंदिवस अधिकच नाराज होऊ लागल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांच्यानंतर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर टीका केली आहे. अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही असे म्हणत गुलाबरावांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गुलाबरावांनी एका जाहीर सभेत बोलताना म्हटले की, "अर्थखात्यासारखे नालायक खाते नाही. आमची फाईल 10 वेळा अर्थ खात्यात गेली. तिथे गेली की आमची फाईल निगेटीव्ह होऊन यायची." अर्थखात्यामधअये आपली कामे होत नसल्याबद्दलची नाराजी गुलाबरावांनी अशा रितीने बोलून दाखवली. यापूर्वीही अजित पवारांवर ठराविक आमदारांना आणि मंत्र्यांना निधी देत असल्याचा आणि विरोधकांची कामे करत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. 

हे ही वाचा : विधानसभेला किती जागा लढणार? अजित पवारांनी पहिल्यांदाच आकडा सांगितला

आम्हाला उलट्या होतात

शिवसेना नेते आणि आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत हे वादग्रस्त विधानांसाठी कायम चर्चेत असतात. त्यांनी अजित पवारांवर जाहीरपणे टीका केली होती.  विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांबद्दलची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जाम संतापले होते.  एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी आपली नाराजी पोहचवली होती. तानाजी सावंत म्हणाले होते की, " जरी आम्ही आज कॅबिनेटमध्ये एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी, कॅबिनेट संपल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर येतो त्यावेळी उलट्या होतात."

हे ही वाचा: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी? मंत्रालयातील लगबगीमळे चाहूल लागली

हाकेंनीही दिली विरोधाची हाक

अहमदपूर विधानसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. यामध्ये भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनीही अजित पवारांवर जाहीरपणे टीका केली होती. अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्देवी आहे,खरं म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली असे त्यांनी म्हटले होते.  असंगाशी संग म्हणतात, असा संग आमच्यासोबत घडवला आहे असे म्हणत हाके यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. त्यांनी आपल्या नाराजीचे कारणही पुढे बोलून दाखवले. ते म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने भाजपचे काम केले नाही. उलट आमचेच पैसे घेऊन काँग्रेसचे काम केले.  भाजपच्या उमेदवाराला पाडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले असा आरोप हाके यांनी केला.  सध्या अजित पवार गटाचेच आमदार अहमदपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते म्हणतात आपली युती आहे. आपली युती होती तर तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का? आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केलं का ? असा प्रश्न हाके यांनी विचारला होता.  यामुळेच अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्देवी आहे असे हाके यांनी म्हटले. 

हे ही वाचा : 'सुप्रिया सुळे म्हणजे किडकी बहीण, लिंबाच्या झाडापासून... ' भाजपा नेत्याची कडवट टीका

भाजप पदाधिकारी कार्यकर्तेही नाराज

काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही नागपुरात आले होते. यावेळी रेशीमबागेतील  डॉ.हेडगेवार आणि गोळवळकर गुरुजींच्या स्मृतिस्थानी जाऊन शिंदे-फडणवीसांनी वंदन केले होते. अजित पवारांनी मात्र पुढचा कार्यक्रम असल्याने स्मृतिस्थानी न जाता पुढील कार्यक्रमास जाण्याचा निर्णय घेतला होता. अजित पवारांचा हा निर्णय भाजपच्या नागपुरातील कार्यकर्त्यांना फारसा रुचलेला नाही. स्मृतिस्थानी गेल्यास अल्पसंख्यांकांची मते आपल्यापासून दुरावतील अशी भीती वाटली असल्याने अजित पवारांनी असे केले असावे अशी चर्चा सुरू झाली आहे.   
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी? मंत्रालयातील लगबगीमळे चाहूल लागली
'नालायक खाते...' अजित पवारांच्या 'गुलाबी' खात्याला सहकाऱ्यानेच टोचले 'काटे'
Maharashtra Government to Launch 'Yojana Doot' Scheme Soon: Selected Candidates to Receive ₹10,000 Monthly
Next Article
सरकारच्या नव्या योजनेत सामील व्हा, हजारो रुपये कमवा! अ‍ॅप्लिकेशन, पात्रता, अटीसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर