मंगेश जोशी | जळगाव
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात गेलेले विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्यावर गिरीश महाजनांनी जोरदार निशाणा साधलाय. गिरीश महाजनांच्या टीकेला उन्मेश पाटील यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत एकत्र काम करणारे दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत.
ज्याचं पुण्य संपलं तो पक्षातून बाहेर जातो. उन्मेश पाटील यांचं पुण्य संपलं म्हणून तुम्ही बाहेर गेले, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. या टीकेला उत्तर देताना उन्मेश पाटील यांनी देखील पुण्याचा हिशेब करायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला. तुमच्याच पापाचा घडा भरला आहे, असं उन्मेश पाटील यांनी म्हटलं आहे.
नाशिकचा तिढा सुटला, महायुतीमधील 'हा' पक्ष लढवणार निवडणूक?
काय म्हणाले गिरीश महाजन?
पक्षात आल्याबरोबर तुम्हाला आमदारकी मिळाली, खासदारकी मिळाली तरी तुम्ही म्हणता आमच्यावर अन्याय झाला. ही निष्ठा आहे का तुमची. इथे मी मी म्हणून चालत नाही. इथे पक्षापेक्षा कुणीही मोठं नाही. ज्याचं पुण्य संपलं तो पक्षातून बाहेर जातो. उन्मेश पाटील यांचं पुण्य संपलं म्हणून तुम्ही बाहेर गेले. तुमची अवस्था आता काय होणार ते बघा, अशा शब्दात गिरीश महाजनांची उन्मेश पाटलांना टीका केली.
शरद पवारांवर बोलणं अर्चना पाटील यांनी टाळलं, कारण...
उन्मेश पाटील यांचं प्रत्युत्तर
पुण्याचा हिशोब करायला गिरीश महाजन वर केव्हा जाऊन आले? पुण्याचा हिशोब करायचा अधिकार गिरीश महाजन यांना कोणी दिला? पुण्याचा हिशेब लोक करतील, शेतकरी करतील, सुज्ञ जनता करेल. कापसाला, दुधाला भाव दिला असता तर तुम्हाला अधिकार होता. तरुण शेतकरी यांना न्याय मिळवून दिला असता तर तुम्हाला पुण्याचा हिशोब करायचा अधिकार होता. मात्र आता तुमच्याच पापाचा घडा भरलाय, असा पलटवार उन्मेश पाटलांनी गिरीश महाजनांवर केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world