जाहिरात
This Article is From Apr 25, 2024

माढाचं मैदान कोण मारणार? धैर्यशील मोहिते पाटील-रणजितसिंह नाईक निंबाळकरांमध्ये अटीतटीची लढत

माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील आणि महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात प्रमुख लढत आहे.

माढाचं मैदान कोण मारणार? धैर्यशील मोहिते पाटील-रणजितसिंह नाईक निंबाळकरांमध्ये अटीतटीची लढत

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर माढा लोकसभा मतदारसंघ सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघांपैकी एक आहे. या मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरीच उलथापालथ पाहायला मिळाली आहे. भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजपच्या गटातूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला. भाजपच्या तिकिटावर धैर्यशील मोहिते पाटील देखील या मतदारसंघातून इच्छूक होते. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली. महाविकास आघाडीकडून धेर्यशील मोहिते पाटीत माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र गतनिवडणुकीत भाजपने तो सर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक यांनी भाजपमध्ये केला. तसेच इतर नेत्यांच्या सहकार्यामुळे मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले. 

(नक्की वाचादीर की भावजय ? अटीतटीच्या लढतीत धाराशिवचा खासदार कोण होणार?)

धैर्यशील मोहिते-पाटलांची जमेची बाजू

सध्याची स्थिती पाहता माढा लोकसभा मतदारसंघात अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेतली आहे. मतदारसंघातील इतर नेत्यांचाही त्यांना पाठिंबा आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील घराण्याचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्यामुळे त्याचा फायदा धैर्यशील मोहिते पाटील  यांना होऊ शकतो.  

माढा मतदारसंघात शरद पवारांना मानणारा देखील मोठा वर्ग आहे. मोहिते पाटील घराणं जमेची बाजू आहेच, याशिवाय राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते उत्तम जानकर यांनीही शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भाजप उमेदवारासमोर एक नवं आव्हान उभं राहिलं आहे. 

रणजितसिंग नाईक निंबाळकरांची ताकद

एकीकडे विरोधकांनी लावलेली ताकद असली तरी माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली विविध विकासकामे आहेत. टॉप १० खासदारांत मिळवलेले स्थान, मतदारसंघातील पाच आमदारांचा असलेला पाठिंबा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले त्यांचे चांगले संबंध, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भक्कम आधार यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर देखील मोहिते पाटलांचा सामना करायला सक्षम दिसत आहेत. 

(नक्की वाचा - शिंदेंच्या लेकीला फडणवीसांच्या 'रामा' चं आव्हान!)

माढा मतदारसंघातील समीकरण

माढा मतदारसंघात धनगर समाजाचा प्राबल्य आहे. उत्तम जानकर धनगर समाजाचे आहेत, पण त्यांना धनगर समाजाकडूनच विरोध सुरू झालेला आहे. ज्यांच्या बरोबर ३० वर्ष संघर्ष केला त्याच मोहिते पाटलांशी हात मिळवणी केल्यामुळे धनगर समाजात तीव्र नाराजी आहे. धनगर समाजातल्या नेत्यांनी डॉ. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. असं असलं तरी फलटणचे रामराजे नाईक निंबाळकरांचे बंधू संजीवराजे निंबाळकर, मालोजीराजांचे वंशज पिट्टूबाबा निंबाळकर त्यांच्या भगिनी यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उघड पाठिंबा दिला आहे. 

माढा मतदासंघातील आमदारांची ताकद

माढा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी ४ सोलापुरात तर दोन मतदारसंघ सातारा जिल्ह्यात येतात. यामध्ये माढामद्ये अजित पवार गटाचे बबन शिंदे, माणमध्ये भाजपचे जयकुमार गोरे, करमाळामध्ये अपक्ष संजय शिंदे, फलटणमध्ये अजित पवार गटाचे दीपक चव्हाण, माळशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते आणि सांगोला येथे शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील आमदार आहेत. महाविकास आघाडीची एकही आमदार इथे नसला तरी मतदारसंघातील राजकीय गणित वेगळी आहे.  मतदार वेगवेगळ्या कारणाने नेत्यांशी जोडले आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. वंचितचे रमेश बारस्कर हे किती मतं मिळवतात हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

मतदान कधी होणार?

माढा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १० लाख ३ हजार ७९५ आहे. याठिकाणी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान पार पडणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com