केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगलीच्या शिराळ्यात भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. या प्रचार सभेत अमित शाह यांनी चक्क काँग्रेसच्या दोन दिवंगत नेत्यांचे कौतूक केले. मात्र दुसरीकडे त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा प्रश्न त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना केला. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख त्यांनी नकली सेना असा केला. अमित शाह यांच्या या सभेमुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.शाह यांनी केलेल्या टीकेला आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगलीच्या शिराळा विधानसभा मतदार संघातील भाजप उमेदवार सत्यजित देशमुख आणि निशिकांत पाटील यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी केलेल्या भाषणा वेळी त्यांनी सुरूवातीलाच काँग्रेसच्या दोन दिवंगत आणि बड्या नेत्यांचं कौतूक केले. त्यांनी वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांचं नाव घेतलं. या दोघांनीही सहकार आंदोलन पुढे नेलं. सहकाराचा जाळा पसरवलं. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं. मी या महान लोकांना प्रणाम करतो असे या वेळी अमित शाह म्हणाले. भाजपच्या व्यासपीठावरून अमित शाह यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लक्ष्य करत त्यांच्यावर हल्लाबोल केला. शरद पवार दहा वर्ष केंद्रात मंत्री होती. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले असा प्रश्न अमित शाह यांनी केला. त्याच हिशोब शरद पवारांना द्यावा लागेल. पण ते हिशोब देणार नाहीत. पवार आणि ठाकरेंना औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करायचे नाही. त्यासाठी त्यांचा विरोध आहे. पण पवारांनी कितीही जोर लावला तरी संभाजीनगर हे नाव होणारच असे शाह यावेळी म्हणाले. कश्मीरमध्ये 370 कलम लागू करण्यासाठी पवार आणि ठाकरेंचा पाठिंबा आहे. पण पवारांच्या चार पिढ्या जरी आल्या तरी कलम 370 हे मागे घेणार नाही.
पवारां बरोबर सध्या उद्धव ठाकरेंची नकली सेना आहे. त्यांनाही कलम 370 पुन्हा बहाल केले पाहीजे असं वाटतं. ठाकरेंना वक्फच्या कायद्याला याच ठाकरे पवारांनी विरोध केला आहे. वोट बँकेचे राजकारण ते करत आहेत. उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे. तर शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे. तर काँग्रेसमध्ये डझनभर नेते मुख्यमंत्रिपदासाठी कोट शिवून तयार आहेत असे अमित शाह म्हणाले. त्यामुळे असे लोक सत्तेवर आले तर ते जनतेचे भलं करू शकत नाही. उलट शेतकऱ्यांच्या जमीन वक्फला देवून टाकतील असा आरोपही शाह यांनी केला.
दरम्यान दिड महिन्यापूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला होता. या दौऱ्यात असं लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या जनतेला पुन्हा महायुतीचं सरकार हवं आहे. केंद्रात मोदींचे सरकार आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यास, हे डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्राला क्रमांक एकचं राज्य बनवेल असं शाह म्हणाले. काँग्रेसने ज्या घोषणा केल्या आहेत, त्या काल्पनीक आहेत. त्या प्रत्यक्षात येवू शकत नाहीत. त्यामुळे महायुतीला मतदान करा असे आवाहन शाह यांनी या सभेत केले.