मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा घेतली. वरळीमध्ये मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांचा सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्याशी आहे. मागील निवडणुकीत आदित्यसाठी मनसेनं वरळीतून उमेदवार दिला नव्हता. त्यानंतर आदित्य पहिल्यांदा आमदार झाले. पुढं महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. यंदा आदित्य दुसऱ्यांदा वरळीतून लढतायत. त्यांच्यापुढं मनसेनं संदीप देशपांडे यांच्या रुपानं तगडा उमेदवार दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे वरळीच्या सभेत आदित्यबद्दल काय बोलतात? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण, राज ठाकरेंनी सर्वांची निराशा केली. त्यांनी संपूर्ण सभेत आदित्य ठाकरे यांचं नावही घेतल नाही. चुलत भाऊ उद्धव ठाकरेंवर त्यांनी जोरदार टीका केली. पण, पुतणे आदित्य यांचं नावही घेतलं नाही. राज यांनी वरळीत येऊनही आदित्य यांचं नाव का घेतलं नाही, यावर सध्या चर्चा सुरु झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले राज ठाकरे?
घाटकोपरची सभा आटोपून निघताना ट्रॅफिक जाम होता. मला सांगितलं तिथं 3 किलोमीटर ट्रॅफिक जाम आहे. मला समजत नव्हतं मी वरळीत वेळेवर पोहोचेल की नाही. शहराचा विचका झाला आहे. कुणाचं लक्ष नाही. नुसती माणसं येतायत, भरलं जातंय. गेली अनेक वर्ष मी वरळी कोळीवाडा बघतोय. शांत, टुमदार होता. सगळा विचका झाला आहे. प्रत्येक बिल्डरचं लक्ष आहे. या ब्रिजवरुन जाताना हा केक मला मिळावं हे सर्व बघत असतात.
आमचा वरळीचा किल्ला इथंच आहे. तो ब्रिटीशांनी 1675 साली बांधला होता. समुद्रमार्गे शत्रू आला तर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता. माझी कोळी बांधवांना विनंती आहे, तुमचा शत्रू जमिनीतून येणार आहे. तिकडं लक्ष असलं पाहिजे. कधी बोलता-बोलता तुमच्या हातातून घेऊन जातील याचा थांगपत्ता लागणार नाही. तुम्ही जायचं नाही. तुम्ही माना खाली घालायच्या नाहीत. तुम्ही रडायचं नाही, तुम्ही रडवायचं, असं राज म्हणाले.
( नक्की वाचा : महायुती आणि मविआचे जाहिरनामे काय सांगतात? मत देण्यापूर्वी वाचा सर्वांची आश्वासनं )
पोलिसांना 48 तास देणार...
बीडीडी चाळीत इतकी वर्ष मराठी माणसं राहतायत. तुम्हाला स्केअर फुटात मोजणारी माणसं कोण आहेत. इथला इतिहास चाळून पाहा. कोळी बांधव हा मुंबईचा मालक आहे. तुम्ही रडायचं नाही. मुंबईमध्ये ज्या प्रकारे रोज लोकं येत आहेत. आमचे पोलीस बांधव काय करतील? कुणाला पत्ता आहे? कोण येतंय करतंय माहिती नाही.
हा देश सर्वांचा आहे, हे मला मान्य आहे. या देशात कुणीही कुठू जाऊ शकतो, हे मला मान्य नाही. कारण या देशाचा कायदा तसा आहे. एखाद्या शहरातून दुसऱ्या शहरात जायचं असेल तर तुम्हाला पोलिसांना ते सांगावं लागतंय.
मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर माझा शंभर टक्के विश्वास आहे. या राज्याची संपूर्ण सत्ता माझ्याकडं दिली तर पोलिसांना 48 तास देईल, मुंबई साफ करुन द्या मला. महाराष्ट्र साफ करुन द्या. त्यांना सहज शक्य आहे, असं राज यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : लातूरमध्ये विलासरावांच्या मुलासमोर भाजपाचं तगडं आव्हान, थेट लढतीचा निकाल काय लागणार? )
बाळासाहेबांनी फोडून काढलं असतं...
रझा अकादमीच्या मोर्च्यात चॅनलची ओबी फोडली. पोलिसांवर हात टाकले. पोलीस बहिणीच्या अब्रूवर हात टाकले. त्या मोर्चावर कुणीही बोललं नाही. फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोर्चा काढला. त्यावेळी पोलीस कमिशनर पोलिसांना हात उचलू नका म्हणून सांगत होते. मग हातामध्ये दांडूके कशाला दिले आहेत, गरबा खेळायला?
उद्धव ठाकरे कसे मुख्यमंत्री झाले हे तुम्हाला माहिती आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरची अडीच वर्ष आठवून पाहा. त्यावेळी शिवसेनेच्या होर्डिंगवरुन बाळासाहेब ठाकरेंच्या होर्डिंवरील हिंदूऱ्हदय सम्राट शब्द काढला का तर काँग्रेस-राष्ट्रवादीला वाईट वाटेल. काही होर्डिंगवर हिंदूऱ्हदय सम्राटच्या ऐवजी जनाब शब्द आला. आज ते (बाळासाहेब ठाकरे) हवे होते, त्यांनी एकेकाला फोडून काढलं असतं. आम्हाला सत्ता आल्यानंतर पहिल्या 48 तासांमध्ये मशिदीवरील भोंगे काढीन, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.
तुम्हाला गृहित धरलं जातं. तुम्ही काय करु शकता? शांत बसणारे लोकं , थंड बसणारे लोकं काय करु शकतात? हा समज तुम्ही दूर करत नाहीत तोपर्यंत ही लोकं वठणीवर येणार नाहीत. देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची आज दशा करुन टाकलीय, असा आरोप त्यांनी केला.
एकदा संधी द्या
मुंबईचे पाच टोल बंद झाले. मनसेचं आंदोलन झालं नसतं तर हे बंद झालं असतं का? मराठी पाट्या करायला तयार नव्हते, मराठी पाट्याच्या विरोधात आंदोलन झालं. आमचा संदीप देशपांडे जेलमध्ये होता. मी पत्रक काढलं, महाराष्ट्रात दुकानाच्या पाट्या मराठी व्हायला लागल्या. जे सरकारनं करायला पाहिजे होत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोधात राहून केलं, याची आठवण राज ठाकरे यांनी करुन दिली.
मला जे शक्य आहे, तेवढ्याच गोष्टींचा मी शब्द देतो. मी तुम्हाला वाट्टेल त्या गोष्टी विकणार नाही. आज कुलाबा ते माहीमपर्यंतची जी मैदानं दिसतात ती ब्रिटीशांच्या काळातील आहेत. य सर्व भागाचं डिझाईन ब्रिटीशांच्या काळातील आहे. 1947 नंतर मुलांना एकही मैदान मिळालं नाही. जी आहेत ती ब्रिटीशांच्या काळातील आहेत.
माझं मुंबई, पुणे, ठाणे, महाराष्ट्राबद्दल स्वप्न आहे. जगात गोष्टी घडू शकतात. महाराष्ट्रात का घडू शकत नाही. महाराष्ट्रातील तरुण-तरुणीमध्ये काहीही कमतरता नाही. महाराष्ट्राची लोकसभेत भूमिका मांडू न शकणाऱ्यांना तुम्ही दिल्लीत पाठवणार? इतकी वर्ष प्रत्येकाला संधी दिली एकदा राज ठाकरेंना द्या, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
हे राज्य हातामध्ये आलं तर महाराष्ट्राची प्रगतीही करीन आणि स्वाभिमानही टिकवीन. कुणासमोर मिंधा होणारा महाराष्ट्र मी होऊ देणार नाही, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील तरुणांना 100 टक्के नोकऱ्या देण्याची हमी मी देतो. त्यातून काही उरल्या तर इतरांना देईन, असं राज यांनी स्पष्ट केलं.