सागर जोशी, प्रतिनिधी
Maharashtra Election 2026 : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले. या मतदानासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असतानाही अनेक ठिकाणी बोगस मतदानाचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये एका उमेदवाराच्या पत्नीच्या नावानेच दुसऱ्या महिलेने मतदान केल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे निवडणूक यंत्रणेच्या सुरक्षेवर आणि नियोजनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
उमेदवाराच्या पत्नीचे बोगस मतदान
छत्रपती संभाजीनगरमधील हा प्रकार अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. येथील उमेदवार पठाण अमेर यांच्या पत्नी जेव्हा मतदान करण्यासाठी केंद्रावर पोहोचल्या, तेव्हा त्यांना त्यांचे मतदान आधीच झाल्याचे सांगण्यात आले. एका अज्ञात महिलेने त्यांच्या नावाने मतदान केले होते. ही अज्ञात महिला बुरखा घालून आली होती, त्यामुळे तिची ओळख पटू शकली नाही आणि तिने सहजपणे मतदान केले.
आपली ओळख लपवून दुसऱ्याच्या नावाने मतदान झाल्याचे समजताच पठाण अमेर आणि त्यांच्या समर्थकांनी मतदान केंद्रावर मोठा गोंधळ घातला. बुरख्याचा गैरफायदा घेऊन बोगस मतदान झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
( नक्की वाचा : Solapur News : सोलापूरमध्ये बालेकिल्ल्यातच भाजपाची गोची; 1500 उमेदवारांनी टाकला बहिष्कार, कारण काय? )
पुण्यातही बोगस मतदानाचा फटका
पुण्यातील प्रभाग क्रमांक 21 मध्येही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. येथील कटारिया हायस्कूलमधील मतदान केंद्रावर शेख हसीना या महिला मतदान करण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या रांगेत उभे राहून जेव्हा आत पोहोचल्या, तेव्हा त्यांचे मतदान आधीच कुणीतरी केल्याचे त्यांना सांगण्यात आले.
या प्रकारामुळे हसीना कमालीच्या संतापल्या. त्यांनी तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बराच वेळ गोंधळ झाल्यानंतर, प्रशासनाने अखेर तोडगा म्हणून त्यांच्याकडून पोस्टल मतदान करून घेतले. मात्र, एका मतदाराला स्वतःचे हक्काचे मतदान करण्यासाठी असा मनस्ताप सहन करावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
( नक्की वाचा : BMC Election 2026: मार्कर वापरण्यास याच वर्षापासून सुरू झाली? 'NDTV मराठी'चे Fact Check )
अकोल्यात नियमांचा बोजवारा
निवडणूक आयोगाने बोगस मतदान रोखण्यासाठी यंदा विशेष खबरदारी घेतली होती. मुस्लिम बहुल भागातील मतदान केंद्रांवर बुरखा घातलेल्या महिलांची ओळख पटवण्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अकोल्यात या नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे चित्र दिसले.
अकोल्यातील भांडपुरा भागातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये अनेक केंद्रांवर महिलांची ओळख न पटवताच त्यांना थेट मतदानासाठी आत सोडले जात होते. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे बोगस मतदानाची शक्यता वाढली आणि निवडणूक आयोगाच्या यंत्रणेची मर्यादा स्पष्ट झाली.
संभाजीनगर, पुणे आणि अकोला या शहरांमधील या घटनांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. बुरखा किंवा इतर कोणत्याही कारणाने मतदाराची ओळख पटवण्यात जर प्रशासन अपयशी ठरत असेल, तर निवडणुकीच्या पारदर्शकतेवर परिणाम होतो. त्यामुळे भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी आणि बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने अधिक सक्षम आणि आधुनिक यंत्रणा राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world