BMC Election 2026: मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचं मतदान सध्या होत आहे. या मतदानाच्या दिवशी सोशल मीडियावर सोशल मीडियावर मतदानाच्या शाईबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेषतः यावेळी मतदारांच्या बोटावर लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मार्कर पेनवरून अनेकांच्या मनात शंका आहेत.
हे मार्कर पेन याच वर्षापासून वापरायला सुरुवात झाली आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. याच संभ्रमावर 'NDTV मराठी'ने फॅक्ट चेक केले असून निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार वस्तुस्थिती समोर आणली आहे.
निवडणूक आयोगाचे जुने आदेश
मुंबई महानगरपालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मार्कर पेन वापरण्याचा निर्णय नवा नाही. राज्य निवडणूक आयोगाने याबाबतचे स्पष्ट आदेश 19 नोव्हेंबर 2011 आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजीच निर्गमित केले आहेत. म्हणजेच गेल्या 14 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा अधिकृतपणे वापर केला जात आहे. त्यामुळे 2026 च्या निवडणुकीत हे पहिल्यांदाच घडत आहे, हा दावा पूर्णपणे चुकीचा ठरतो.
( नक्की वाचा : Maharashtra Election 2026 : राज्यातील 29 महापालिकांसाठी होणार मतदान! वेळ, ठिकाण आणि नियम; वाचा A to Z माहिती )
शाई लावण्याची योग्य पद्धत काय?
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मार्कर पेनने शाई लावताना ती मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल अशा बेताने लावायची असते. नखावर आणि नखाच्या वरच्या बाजूला असलेल्या त्वचेवर हे पेन 3 ते 4 वेळा घासून शाई लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मार्कर पेनच्या आवरणावरही या सूचना स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात, जेणेकरून मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून कोणतीही चूक होऊ नये.
शाई पुसली तरी पुन्हा मतदान शक्य नाही
काही लोक शाई पुसून पुन्हा मतदान करता येते का, असा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, बोटावरची शाई पुसण्याचा प्रयत्न करणे हे कायदेशीर गुन्हा किंवा गैरकृत्य मानले जाते.
एखादी व्यक्ती शाई पुसून पुन्हा मतदान केंद्रावर आल्याचे आढळले, तर तिच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केवळ शाई पुसली म्हणून कोणालाही दुसऱ्यांदा मतदान करता येत नाही, कारण मतदाराने मतदान केल्याची नोंद निवडणूक यंत्रणेकडे आधीच झालेली असते.
निवडणूक आयोगाचे आवाहन
निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शाई पुसण्यासारखे गैरकृत्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडावे, असेही आयोगाने म्हटले आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world