जाहिरात

महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच दिलं थेट उत्तर

Jayant Patil Exclusive : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'महाराष्ट्राचा जाहीरनामा कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच दिलं थेट उत्तर
Jayant Patil
मुंबई:

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडलाय. खासदार संजय राऊत यांनी 'NDTV मराठी' च्या 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रीपदालाठी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'महाराष्ट्राचा जाहीरनामा कार्यक्रमात बोलताना त्याला उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

महायुतीचा चेहरा फडणवीस तर आमचा...

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जयंत पाटील असल्याचे संकेत दिले होते. त्यावर बोलताना पाटील यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री निवडणुकीच्या आधी ठरवण्याची प्रथा नाही. महायुतीचा चेहरा देवेंद्र फडणवीस होतायत असं दिसतंय. फडणवीस हा चेहरा ठरला असेल तर त्यांनी तो जाहीर करावा. आम्ही 30 तारखेला एकत्र बसल्यावर आमचं धोरण ठरवू. 

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावा, या मानसिकतेमध्ये आम्ही नाहीत. ही घाई होते. त्यावर प्रतिक्रिया होतात. हा शेवटचा मुद्दा आहे. तो आमच्यासाठी नाही. पण समोर देवेंद्र फडणवीस आहोत हे आम्हाला दिसतातयत.महायुतीचा चेहरा देवेंद्र फडणवीस ठरलेला आहे आमचे अजून जागा वाटपच झालेले नाही, असं पाटील यांनी मान्य केलं. 

शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना पाटील म्हणाले की, कल्पना फार चांगल्या आहेत. पण, संख्या येईपर्यंत त्यावर भाष्य करणं माझा इरादा नाही. महाविकास आघाडीचं बहुमत येणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होणं महत्त्वाचं आहे. पवार साहेबांचा मला नेहमी आशीर्वाद आहे. त्यांनी सदिच्छा बोलून दाखवली आहे, असं पाटील यांनी सांगितलं. 

Exclusive : एकनाथ शिंदेच्या बंडाची ठिणगी कधी पडली? फडणवीसांनी सांगितली 'त्या' रात्रीची गोष्ट

( नक्की वाचा : Exclusive : एकनाथ शिंदेच्या बंडाची ठिणगी कधी पडली? फडणवीसांनी सांगितली 'त्या' रात्रीची गोष्ट )

वाद मिटवणं आमच्यापुढचं आव्हान 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला प्रचंड प्रतिसाद आहे. जिथं अर्ज करायला माणसं मिळणार नाही असं सहा महिन्यापूर्वी लोकं म्हणायची. तिथं वाद मिटवून उमेदवारी देणं हे आमच्यापुढचं आव्हान आहे. अजित पवारांकडं सत्तेच्या प्रभावामुळे अनेक जण गेली. पण बऱ्यााच लोकांना शरद पवारांशिवाय राहणं शक्य नाही, हे लक्षात आलं. पण, आम्ही मर्यादीत लोकांना परतीची संधी दिली. पक्ष फुटला तरी सामान्य माणसं शरद पवारांच्या मागं उभी टाकली हा मोठा गुणात्मक भाग आहे, असं पाटील यांनी सांगितलं. 

प्रचंड वाढलेली महागाई, प्रचंड वाढलेलं बेरोजगारीचं आव्हान, महाराष्ट्रातील महिला सुरक्षित नाहीत. मुलबाळं सुरक्षित नसतील तर सरकारला अर्थ काय? असं विचारणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहेत. त्याच्या जोडीला भ्रष्टाचार या सर्व गोष्टींबाबतीत रोष जनतेत आहेत. त्याला घाबरुन सरकार अनेक योजना जाहीर करायला लागलं आहे, असा टोला पाटील यांनी लगावला.

आम्ही देखील देवीला बोकड देतो, 100 देवळं फिरतो - जितेंद्र आव्हाड

( नक्की वाचा : आम्ही देखील देवीला बोकड देतो, 100 देवळं फिरतो - जितेंद्र आव्हाड )

'मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात फरक'

लाडकी बहीण योजनेचा GR 28 तारखेला निघाला. 1 जुलैपासून फॉर्म देणं सुरु झालं. याचा प्रशासकीय खर्च म्हणून 2500 कोटी खर्च करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी APP तयार करायला एका लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला टेंडर दिलं. लाडक्या बहिणींना पैसे देण्याऐवजी त्यांच्या माणसांना पैसे दिले. लाडक्या बहिणीची अवस्था महाराष्ट्रात काय आहे. भाजपाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबाबत काय विचार करतात, महिलांबाबत भाजपा आणि त्यांच्या युतीमधील पक्षांची महिलांकडं पाहण्याची धारणा कशी आहे, हे वारंवार स्पष्ट झालं. 

योजना लोकप्रिय करण्यासाठी तुम्ही पैसे खर्च करण्याचे उद्योग केले नसते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जमीन-आस्मानचा अंतर आहे. सरकारकडून काय अपेक्षा करावी हे आमच्या भगिनींना माहिती आहे. त्याचा परिणाम इथं दिसत नाही. त्यामुळे मध्य प्रदेशसारखा इथं परिणाम होणार नाही. पैसे मिळायला लागल्यावर चांगलं वाटतं. तसा फिल गुड फॅक्टर दोन महिने होता. पण, त्याचा निकालावर परिणाम होणार नाही. 

आम्ही जवळपास 90 जागा लढवू. निवडून येण्याची शक्यता या निकषावरच आम्ही महाविकास आघाडीकडं जागांची मागणी केली आहे. त्यामुळे आमचा निकाल चांगला लागेल. आता आमदार होणं सोपं आहे. आमदार होऊ असा अनेकांना आत्मविश्वास आहे. त्यामुळे पक्षाकडं तिकीट मागतात आणि मागणी मान्य झाली नाही तर अर्ज मागे घेतात, पण, अनेकजण अर्ज मागे घेतील.

मराठा विरुद्ध OBC लढत अनेक ठिकाणी होईल अशी रचना केली जात असल्याचा पक्षावरील आरोप जयंत पाटील यांनी फेटाळला. आम्ही निवडून येणं हाच निकष आहे. निवडून येण्याची क्षमता जिथं जास्त तिथं त्याला उभं केलं आहे, असंही पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.