जाहिरात
This Article is From Apr 26, 2024

'कचाकच बटण दाबा' विधानामुळे आचारसंहितेचा भंग नाही! निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Ajit Pawar : निवडणूक आयोगानं उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा दिला आहे.

'कचाकच बटण दाबा' विधानामुळे आचारसंहितेचा भंग नाही!  निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
अजित पवारांच्या वक्तव्याच्या विरोधात आयोगाकडं तक्रार करण्यात आली होती.
मुंबई:

ईव्हीएमचे बटण कचाकच दाबा तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले होते. या विधानावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. यावर आयोगाने आपला फैसला दिला असून अजित पवारांच्या विधानामुळे आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. मत दिले तरच निधी मिळेल अशी अजित पवार यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती, आणि या तक्रारीत प्राथमिकदृष्ट्या कोणतेही तथ्य आढळले नसल्याचे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने निवडणूक आयोगाकडे, अजित पवार यांच्याविरोधात आदर्श आचारसंहिता आणि लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. बारामतीमधील व्यापाऱ्यांशी संवाद साधताना अजित पवार यांनी म्हटले होते की,  "पाहीजे तेवढा निधी देऊ तशी मशिनमध्येही बटने दाबा कचाकचा, म्हणजे मलाही निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल. "

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका करताना म्हटले होते की, "ते व्यापारी आहे त्यामुळे ते सौदाच करणार मुळातच हा देश व्यापारी चालवत आहे. त्यांनी प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात एजंट निर्माण केले आहेत. त्यापैकी अजित पवार एक आहेत." राशपनेही अजित पवारांच्या विधानावर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी सदर तक्रारीचा फैसला केला आहे. त्यांनी तक्रार मिळाल्यानंतर अजित पवारांकडून उत्तर मागवले होते. द्विवेदी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की त्यांनी अजित पवारांचे भाषण ऐकले आणि त्यात त्यांना आचारसंहितेचा भंग करणारे कोणतेही विधान केले नसल्याचे दिसून आल्याने द्विवेदी यांनी म्हटले आहे.

( नक्की वाचा : सुनेत्रा पवारांना क्लीन चिट, 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचा होता आरोप )

पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटले की निवडणूक अधिकाऱ्यांनी आपला अहवाल सादर केला असून त्यात अजित पवारांकडून आचारसंहितेचे उल्लंघन झाले नसल्याचे म्हटले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि राशपच्या सुप्रिया सुळे यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com