Pune Lok Sabha 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत दिसत असली तर प्रमुख लढत महायुती आणि महाविकास आघाडीतच आहे. महायुतीकडून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि महाविकासकडून रविंद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर मनसेने तिकीट नाकारल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवत या निवडणुकीत उडी घेतली. त्यामुळे पुण्यातील दोघात तिसरा उमेदवार निर्णायक ठरु शकतो.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास
पुण्यात 1991 साली भाजपाचा खासदार पहिल्यांदा निवडून आला. अण्णा जोशी खासदार झाले. त्यानंतर 1996 साली काँग्रेसच्या सुरेश कलमाडींनी ही जागा भाजपाकडून हिसकावून घेतली. 2004 आणि 2009 मध्येही कलमाडी पुण्याचे खासदार होते. 2014 मधील मोदी लाटेत पुण्यावर पुन्हा भाजपानं झेंडा फडकवला. तेव्हापासून गेली 10 वर्ष पुण्याची जागा भाजपाकडे आहे. 2014 मधील निवडणुकीत अनिल शिरोळे तर 2019 साली गिरीश बापट पुण्यातून विजयी झाले.
गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपचा लोकसभा उमेदवार कोण होणार? हे निश्चित होत नव्हतं. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक तसंच माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांची नावं चर्चेत होती. अखेर भाजपाने मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. तर काँग्रेसकडूनही अनेक जण इच्छूक होते. या सर्वांना मागे टाकत कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
(नक्की वाचा - Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूरकरांचं यंदा काय ठरलंय? शाहू महाराज की संजय मंडलिक?)
पक्षीय बलाबल
पुणे लोकसभा मतदारसंघात शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टॉन्मेंट, वडगाव शेरी आणि कसबा पेठ असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती आणि पुणे कॅन्टॉन्मेंट या चार मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तर कसबा पेठेतमध्ये स्वत: रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत.
विधानसभेच्या सहापैकी पाच मतदारसंघात महायुतीची ताकद आहे. तर महाविकास आघाडीचा एक आमदार येथे आहे. मात्र महाविकास आघाडीचे आमदार रविंद्र धंगेकर यांना त्यांच्या मतदारसंघातून किती मतदान मिळेल याबाबत देखील शंका आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर यांनी विजय मिळवला होता. मात्र त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. कारण ब्राह्मण उमेदवार न दिल्याने भाजपला फटका बसला होता. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवत ब्राह्मण समाजाची नाराजी भाजपने दूर केली आहे. याचा फायदा देखील भाजपला या निवडणुकीत होईल. अशा रितीने भाजप सहाही मतदारसंघात प्लसमध्ये आहे.
(नक्की वाचा- Sangli Lok Sabha 2024: जिंकणार तर 'पाटील'च! पण कोणते?; सांगलीकरांचा कौल कुणाला?)
धंगेकरांची सरप्राईज करणारी ताकद
कागदावर दिसणारी बेरीज रविंद्र धंगेकर चुकीची ठरवू शकतात. विधानसभा पोटनिवडणुकीत ते दिसून आलं. आमदार झाल्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी पुण्यात आमदार म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध मुद्द्यांवर आंदोलने करुन लोकांचा आवाज बनण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे सोशल मीडियावर देखील त्यांच्या फॉलोअर्स संख्या मोठी आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीचा प्रचार
पुण्यातील निवडणुकीत उमेदवारांनी राष्ट्रीय प्रश्न आणि स्थानिक प्रश्नांवर भर दिला. मुरलीधर मोहोळ आणि भाजपने पुण्यात घरोघरी जाऊन प्रचार केला. मुरलीधर मोहोळ यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मोहोळ यांच्यासाठी सभा घेतली. राज ठाकरे यांच्या सभेने देखील मनसेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. त्यामुळे मनसैनिक देखील मोठ्या ताकदीने मैदानात उतरले. याचा फायदा देखील मोहोळ यांना होऊ शकतो. तर देवेंद्र फडणवीसांनी देखील पुण्याची निवडणूक अगदी मनावर घेतली. मुरलीधर मोहोळ यांनी प्रचारात 'मोदी गॅरंटी', मेट्रो, रिंगरोडचं काम, रस्तेविकाम पुण्यातील इतर विकासकामे या मुद्द्यांवर लढवली.
दुसरी रविंद्र धंगेकर यांच्यासाठी देखील राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सभा पार पडल्या. महाविकास आघाडीचे इतर नेते देखील प्रचारात ताकदीने प्रचारात उतरले. धंगेकर यांना आमदार झाल्यानंतर लोकांचे अनेक प्रश्न उचलून धरले. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीविरोधातही धंगेकर यांनी आवाज उठवला. पुणेकरांच्या मनातील प्रश्नांवर धंगेकरांना बोट ठेवलं होतं. याचा फायदा त्यांना होऊ शकतो. अशारितीने पुण्यातील विकासकामे, मेट्रो, विमानतळ, आयटी हब हे मुद्दे प्रचार आघाडीवर होते.
(वाचा - Baramati Lok Sabha 2024: नणंद की भावजय? बारामतीचा गड कोणत्या पवारांकडे राहणार?)
वंचित फॅक्टरचा प्रभाव
पुण्याच वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे रिंगणात आहे. वसंत मोरे पुण्यातील राजकीय क्षेत्रातील ओळखीचा चेहरा आहे. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणे, नगरसेवक म्हणून केलेली कामे, लोकांसाठी उपलब्ध असलेला नेता हे फॅक्टर वसंत मोरे यांना बळकट बनवतात. यात वंचितची ताकद मागे आल्याने त्यांना आणखी बळ मिळालं आहे. त्यामुळे मोठी मतं त्यांनी खेचल्याचा अंदाज आहे. मात्र याचा फटका रविंद्र धंगेकर यांना बसण्याची शक्यता आहे.
पुणे मतदारसंघातील मतदान
पुणे मतदारसंघात यावेळी 53.54 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये वडगाव शेरी येथे 51.71 टक्के, कसबा पेठ येथे 59.24 टक्के, शिवाजीनगर येथे 50.67 टक्के, कोथरुड येथे 52.43. पर्वती येथे 55.47 टक्के, पुणे छावणी येथे 53.13 टक्के मतदान झालं.
पुणे मतदारसंघातील आमदारांची ताकद
- वडगांव शेरी विधानसभा - सुनील टिंगरे (अजित पवार गट)
- शिवाजीनगर विधानसभा - सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
- कोथरूड विधानसभा- चंद्रकांत पाटील (भाजप)
- पर्वती विधानसभा - माधुरी मिसाळ (भाजप)
- पुणे छावणी विधानसभा - सुनील कांबळे (भाजप)
- कसबा पेठ विधानसभा - रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world