Raigad Lok sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी (7 मे) रोजी मतदान होतंय. या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी बनलीय. या लक्षवेधी लढतीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघावर सर्वांचं लक्ष आहे. शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला अशी रायगडची ओळख होती. मागील निवडणुकीत याला राष्ट्रवादीनं खिंडार पाडलं होतं. आता 5 वर्षांमध्ये या मतदारसंघात काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेऊया
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रायगडचा इतिहास काय सांगतो?
रायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यामधील 4 आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील 2 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर या मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. 2009 ते 2019 या कालावधीमध्ये शिवसेनेते अनंत गीते रायगडचे खासदार होते.
( नक्की वाचा : सातारा लोकसभा निवडणूक : पवारांवरील निष्ठा की राजेंचा मान? चुरशीच्या लढतीकडं राज्याचं लक्ष )
2009 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत झाली होती. त्यावेळी अनंत गीते यांनी माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचा पराभव केला. गीते यांना 4,13, 546 मतं मिळाली. तर अंतुले यांना 2,67,025 मतं मिळाली होती. 2014 च्या निवडणुकीतही शिवसेनेने अनंत गीते यांना तिकीट देऊन पुन्हा विजयाची पुनरावृत्ती केली.
अनंत गीते यांची हॅट्ट्रिक 2019 साली हुकली. राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी अनंत गीतेंचा पराभव जवळपास 31 हजार मतांनी केला. या निवणुकीत पुन्हा हे दोघे आमने सामने आले आहेत. राज्यात गेल्या अडीच वर्षात राजकीय गणितं बदलली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांचे दोन गट पडलेत. त्यामुळे त्यांच्या मतांचीही विभागणी होणार आहे.
( नक्की वाचा : रायगड कोण सर करणार? गिते-तटकरेंसाठी प्रतिष्ठेची लढाई )
शिवसेनेला आपला बाल्लेकिल्ला जपून ठेवण्यात यश मिळतंय कि पुन्हा राष्ट्रवादीचा विजय होतो हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. रायगड मतदारसंघात मंगळवारी मतदान होणार असून 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर रायगडचा नवा खासदार स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world