शरद पवार ही भारतीय राजकारणातील अशी व्यक्ती जी नेहमी आपल्या राजकीय खेळीने भल्याभल्यांना हैराण करते. राजकारणाशी त्यांचं असलेलं नातं अनेक दशकांपूर्वीचं आहे. ते अवघे 27 वर्षांचे असताना आमदार झाले होते. त्यांचा राजकीय अनुभव 50 वर्षांहून अधिक आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापनदिन आहे. त्यांनी सुरू केलेल्या राष्ट्रवादीने अनेक आव्हान स्वीकारली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांचा पक्ष संपेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र शरद पवार नावाच्या अवलियाने गड केवळ राखलाच नाही तर तो जिंकलाही. त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या शरद पवारांनी देशाच्या राजकारणात अशी जागा तयार केलीये, की आज ते कोणत्याही खेळीचा उलटफेर करू शकतात.
शरद पवारांचा जन्म पुण्यातील बारामती येथे 12 डिसेंबर 1940 रोजी झाला होता. त्यांना राजकारणाचा वारसा मिळाला होता. शरद पवारांचे वडील गोविंदरकाव पवार आणि आई शारदाबाई भोसले दोघेही राजकारणात सक्रिय होते. यामुळे लहानपणापासून त्यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळत होतं. शरद पवार तीन दिवसांचे असताना त्यांची आई लोकल बोर्डाच्या बैठकीत त्यांना सोबत घेऊन गेली होती. शरद पवारांनी बीएमसी महाविद्यालयातून पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. अभ्यासापेक्षाही राजकारणात त्यांना अधिक आवड होती.
1960 पासून पवार राजकारणात सक्रिय...
1960 मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी सक्रिय राजकारणात पाऊल ठेवलं. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच काँग्रेससोबत काम करण्यास सुरुवात केली. त्या दरम्यान काँग्रेसचे मोठे नेता केशवराज जेधे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या बारामती लोकसभेची जागा रिकामी झाली होती. या जागेसाठी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पीडब्ल्यूपी पार्टीने शरद पवारांच्या मोठ्या भावाला येथून तिकीट दिलं, तर याच जागेवरुन काँग्रेसने केशवराव यांच्या मुलाला उमेदवारी दिली होती. अशात त्यांच्या मोठ्या भावाने शरद पवारांना सांगितलं की, जर ते काँग्रेस सोबत असतील तर त्यांनी त्याच उमेदवाराचा प्रचार करायला हवा. त्यानुसार शरद पवारांनी स्वत:च्या भावाच्या विरोधात राहिलेल्या उमेदवाराचा प्रचार केला. यात त्या उमेदवाराचा विजयही झाला आणि शरद पवारांची सक्रिय राजकारणात एन्ट्री झाली.
वयाच्या 27 व्या वर्षी बनले आमदार..
काँग्रेसने 1967 मध्ये शरद पवारांना बारामती विधानसभेवरून तिकीट दिलं. 27 वर्षांचे पवार पहिल्यांदा बारामती जागेवरुन आमदार झाले. तेव्हापासून आतापर्यंत ही जागा पवारांकडेच राहिली आहे. 1991 पर्यंत शरद पवार या जागेवरुन आमदार होते. गेल्या पाच दशकात शरद पवारांनी 14 वेळा निवडणुकीत यश मिळवलं आहे.
सर्वात कमी वयात झाले मुख्यमंत्री...
शरद पवार अवघ्या 38 वर्षांचे असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ज्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री झाले त्यांच्याजवळ 180 आमदारांचं समर्थन होतं. तर विधानसभेच्या एकूण सदस्यांची संख्या 288 होती. 1978 पर्यंत इतक्या कमी वयात कोणताही नेता मुख्यमंत्री होऊ शकला नव्हता.
अशी NCP केली उभी...
1998 मध्ये सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. याबाबत शरद पवार खूश नव्हते. यावेळी सोनिया गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवारी देण्यावरुन शरद पवारांनी विरोध केला. त्यांच्या या विरोधातून 20 मे 1999 मध्ये काँग्रेसने त्यांना पक्षातून पुढील सहा वर्षांसाठी बडतर्फ केलं. या घटनेनंतर शरद पवारांनी आपल्या पार्टीची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठेवलं.