उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही सर्वांची इच्छा होती. शिवसेनेतेली काही जण भाजपासोबत गेले. आमचे काही जण गेले. आमदार फुटले नसते तर 20 वर्ष सरकार बदललं नसतं, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवार यांनी 'NDTV मराठी' ला Exclusive मुलाखत दिली. त्यामध्ये ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग, अजित पवारांचा पाहाटेचा शपथविधी, बारामती लोकसभा निवडणूक यासह वेगवेगळ्या प्रश्नांना पवार यांनी या मुलाखतीमध्ये उत्तर दिली.
ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. पक्ष फुटला दोन भाग झाले. भाजपासोबत जायचं नाही या एका विचारधारेनं आम्ही काम करत आहोत. ही एक मोठी संधी आहे, आव्हान आहे असं आम्ही मानतो. तरुण पिढी, वडिलधारी मंडळी, शेतकरी वर्गाचा प्रतिसाद आम्हाला दिसत आहे, असा दावा पवार यांनी केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
20 वर्ष सरकार बदललं नसतं
महाविकास आघाडीची कल्पना लोकांना आवडली. भाजपा सरकार बदलण्याची त्यांची मानसिकता होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे अशी सर्वांची इच्छा होती. हे सरकार टिकण्यासाठी ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी आमची भूमिका होती. एकनाथ शिंदे यांचं मत वेगळं असू शकतं, मी त्यांना दोष देणार नाही.
शिवसेनेतील काही सहकारी भाजपासोबत गेले. आमचे काही लोक गेले. आमदार फुटले नसते तर 20 वर्ष सरकार बदललं नसतं, असा मोठा दावा पवार यांनी केला. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा कुणालाही न विचारता दिला. आम्हाला कुणी विचारलं नाही. त्याची किंमत मोजावी लागली, या शब्दात पवार यांनी या मुलाखतीमध्ये नाना पटोले आणि काँग्रेसवर टीका केली.
( नक्की वाचा : सांगलीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, पुढे काय तेही सांगितले )
पहाटेच्या शपथविधीला संमती नव्हती
महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी अजित पवार यांनी भाजपाशी हातमिळवणी केली होती. सर्वांनाच धक्का देत भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. या घटनाक्रमावरही शरद पवार यांनी खुलासा केला. या पहाटेच्या शपथविधीला माझी संमती नव्हती. भाजपासोबत जायला माझी अजिबात परवानगी नव्हती, असं पवार यांनी सांगितलं.
राजकीय संन्यास का घेतला?
शरद पवारांनी वर्षभरापूर्वी धक्कातंत्राचा वापर करत राजकीय संन्यासाची घोषणा केली होती. तो माझा निर्णय होता. त्यानंतर काही जणांनी भाजपासोबत जाण्याची भूमिका घेतली ती आम्हाला मान्य नव्हती. भाजपा सरकारमध्ये सुप्रिया सुळे मंत्री होणार हे शक्य नाही. सुप्रिया सुळेंनी संघटनात्मक जबाबदारी घ्यावी असं काही जणांचं मत होतं. त्यानंतर वेगळ्याच घटना घडल्या.
( नक्की वाचा : पवारांच्या सभेतून थेट फडणवीसांच्या मंचावर, माढ्यात चाललंय तरी काय? )
उत्तराधिकारी कोण?
माझा उत्तराधिकारी कोण? हा निर्णय कार्यकारिणीनं घ्यायचा आहे. प्रफुल पटेल भाजपासोबत सत्तेसाठी गेले. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार धादांत खोटं बोलत आहेत. भाजपासोबत सत्ता हवीय म्हणून विकासाचं नाव घेतलं. काहींनी तुरुंगात जावं लागेल म्हणून जाण्याचा निर्णय घेतला, असा मोठा दावा पवार यांनी केला. प्रफुल पटेल यांच्या घरासमोरच ईडीचं कार्यालय आहे. भाजपा आणि ईडीची भीती असल्यानं सत्तेत सहभागी झाले. भाजपासोबत जाण्यासाठी बैठकीत चर्चा झाली, हे मी नाकारत नाही. पण आम्ही गेलो नाही. भाजपाच्या दावणीला पक्ष बांधला जाणार नाही, असं पवार यांनी सांगितलं.
बारामतीकरांवर विश्वास
बारामतीच्या जनतेवर माझा विश्वास आहे. बाकी कुणी अन्य साधनांचा वापर केला तरी काही होणार नाही. माझ्या मुलीनं बारामती मतदारसंघात चांगलं काम केलं आहे. बारामतीमध्ये 20 वर्ष अजित पवार निर्णय घेत होते. त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्या विश्वासाचे काय झाले हे जनतेनं पाहिलं, असा टोला पवारांनी लगावला.
भारताचा पंतप्रधान एका धर्माचा असू शकत नाही. पंतप्रधानपद ही एक संस्था आहे. समाजातील एका घटकाविषयी टोकाची भूमिकाी घेतात त्यामुळे सामाजिक धोका निर्माण होईल, अशी टीका पवारांनी केली. वंचित आघाडी आमच्यासोबत यावी यासाठी मनापासून प्रयत्न केले, पुढील काळात वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न असेल. आता वंचितची स्थिती पूर्वीसारखी चांगली राहिली नाही, असंही पवार यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सांगितलं.