जाहिरात
This Article is From May 02, 2024

पवारांच्या सभेतून थेट फडणवीसांच्या मंचावर, माढ्यात चाललंय तरी काय?

पवारांच्या सभेतून थेट फडणवीसांच्या मंचावर, माढ्यात चाललंय तरी काय?
माढा:

माढा लोकसभा निवडणूक आता शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली आहे. शरद पवारांनी माढ्यात भाजपला एकामागून एक धक्के दिले. त्यानंतर फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आले. आधी मोहिते पाटील घराण्यातीलच धवलसिंह मोहिते पाटील यांना फडणवीसांनी गळाला लावले. त्यानंतर शरद पवारांचे अत्यंत जवळचे अभिजीत पाटील यांना फडणवीसांनी आपल्या गोटात ओढून घेतले आहे. त्यामुळे माढ्याच्या मैदानात सध्या तुल्यबळ लढत अनुभवायला भेटत आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )


अभिजीत पाटील यांचा भाजपला पाठींबा 

शरद पवारांचे खंदे समर्थक अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठींबा जाहीर केला आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात सापडलेला आहे. मायबाप सरकारकडे आम्ही मदतीची मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वतोपरी मदत करतो असा शब्द दिला आहे.  त्यामुळे कारखाना अर्थिक संकटातून नक्की बाहेर पडेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस आम्हाला मदत करणार असल्याने आम्ही त्यांना लोकसभेला मदत करत आहोत असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे माढ्यात आणि सोलापूरात भाजप उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली नाही. शिवाय आपणही तसा निर्णय घेतला नाही असेही ते म्हणाले.  

हेही वाचा - सांगलीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, पुढे काय तेही सांगितले

कोण आहेत अभिजीत पाटील? 

अभिजीत पाटील हे करमाळ्यातील मोठं प्रस्थ आहे. त्यांची मोठी ताकद आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. शरद पवारांचे अत्यंत जवळचे म्हणून त्यांची ओळख आहे. अजित पवारांनी बंड केले. त्यानंतरही पाटील हे शरद पवारांबरोबरच होते. माढा लोकसभा मतदार संघातून त्यांनी धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या प्रचाराचीही सुरूवात केली होती. मात्र त्याच वेळी त्यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली. त्यांची तिन गोडाऊन सील करण्यात आली. हे जेव्हा घडत होते त्यावेळी अभिजीत पाटील हे करमाळ्यात शरद पवारांच्या सभेत होते. ही बातमी त्यांना तिथेच समजली. त्यानंतर ते तिथून ताडकन निघून गेले होते.   

माढ्यात काट्याची टक्कर 

माढा लोकसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात काट्याची टक्कर होत आहे. या मतदार संघात सुरूवातीपासूनच अनेक घडामोडी घडल्या. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने मोहिते पाटलांनी पवारांचा हात धरला. पवारांनीही एकामागू एक दणके भाजपला देत आपली बाजू मजबूत केली. उत्तर जानकरांसारखा नेता आपल्याकडे वळवण्यात पवारांना यश आले. शिवाय सांगोल्याचे अनिकेत देशमुख यांची समजूत काढण्यातही त्यांना यश आले होते. रामराजेंना मानणारा एक गटही पवारांच्या मागे ताकदीने उभा आहे. त्यामुळे फडणवीसांचे टेन्शन वाढले होते. मात्र फडणवीसांनीही पवारांना आता एकामागून एक धक्के द्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे या मतदार संघातली लढत रोचक झाली आहे.     
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com