जाहिरात
This Article is From May 06, 2024

प्रकृती बिघडल्याने शरद पवारांची आष्टीची सभा रद्द, बीडच्या उमेदवाराची भावनिक पोस्ट 

शरद पवारांची प्रकृती बिघडल्याने बीडमधील सभा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

प्रकृती बिघडल्याने शरद पवारांची आष्टीची सभा रद्द, बीडच्या उमेदवाराची भावनिक पोस्ट 
बीड:
महाविकास आघाडीच्या विजयासाठी वयाच्या 88 व्या वर्षीही शरद पवार दिवसाला अनेक सभा घेत आहेत. यातच त्यांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त समोर आलं असून बीडमधील सभा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. शरद पवारांची बीड मधील सभा रद्द झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांची फेसबुक पोस्ट समोर आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शरद पवारांना तब्येत जपा अशी विनंती केली आहे. दुसरीकडे आज पंकजा मुंडे यांच्या बीड, गेवराई  ग्रामीण भागात मतदारांना भेट देणार आहे. तर मंत्री धनंजय मुंडे परळी मतदारसंघातील गावांना भेट देणार आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आज बीडच्या आष्टीमध्ये महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार होते.काल रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील दोन दिवसाचे दौरे रद्द केले आहेत. त्यानंतर मध्य रात्री बजरंग सोनवणे यांनी भावनिक फेसबुक पोस्ट केली आहे.
अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग सोनावणे यांनी गेल्या महिन्यात अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला होता. याचवेळी त्यांना शरद पवार गटाकडून बीडमध्ये उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. बजरंग सोनावणे या बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून मविआचे उमेदवार आहेत. यापूर्वी 2019 मध्येही बजरंग सोनावणे यांनी प्रीतम मुंडे यांच्याविरोधात बीड लोकसभा निवडणूक लढवली होती.

नक्की वाचा - बारामतीत अजित पवार-शरद पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; सांगता सभेआधीच्या रॅलीतील प्रकार

बजरंग सोनावणेंची भावनिक पोस्ट...

साहेब, तब्येतीला जपा!
तब्येतीच्या कारणास्तव उद्या माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला आपण येणार नाही, हे समजलं आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही.. तुमची तब्येत खराब झाल्याचे कळले. मागील पाच-सहा दशके अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील तुम्ही. तुमच्या नावावरच झाल्या त्या! मागील कित्येक दशके महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला अभिमानानं आव्हान देतो. पण साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा.
लढणं, तेही विपरीत परिस्थितीत, तुम्ही या देशाला दाखवून दिलंय. विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! आता पुढची जबाबदारी आमची. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच लढू द्या! साहेब फक्त प्रकृतीची काळजी घ्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त, तब्येतीला जपा साहेब. आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहुद्या.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com