विशाल पाटील, प्रतिनिधी
Municipal Corporation Election Results 2026 : राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल समोर आले आहेत. एकूण महानगरपालिकांमधून भाजपला सर्वाधिक जागा १४४१ वर विजय मिळवता आला असून शिंदे गट केवळ ४०८ जागा जिंकता आल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकवर काँग्रेस आहे. काँग्रेसचे ३१७ नगरसेवक निवडून आले आहेत. या निकालात शिंदे गटाला अपेक्षित यश मिळवता आलेलं नाही.
महानगरपालिकेत अपेक्षित यश नाही...
राज्यातील २९ पालिका निवडणुकीत अपेक्षित निकाल न आल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पालिका निवडणुकांमध्ये पक्षातील मंत्री आणि आमदार यांच्या सुमार कामगिरीवर एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. पालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी पक्षातील मंत्री आणि आमदारांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली होती. मात्र ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाहीत. त्यामुळे जबाबदारी सोपवलेल्या मंत्र्यांच्या सुमार कामगिरीची गंभीर दखल घेत, शिंदे पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार असल्याचे कळते.
बड्या मंत्र्यांना डच्चू देणार...
एकनाथ शिंदेंनी पालिका निवडणूकीपूर्वीच मंत्र्यांना याबाबत संकेत दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पालिका निवडणूक ही सेनेच्या मंत्र्यांसाठी लिटमस्ट टेस्ट होती असे बोलले जाते. त्यामुळे अकार्यक्षम मंत्र्यांवर पक्षाची जबाबदारी सोपवून शिंदे नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देणार असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद, नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकीत पक्ष जरी दुसर्या क्रमांकावर असला तरी अपेक्षित कामगिरीही नेत्यांकडून झाली नसल्याने मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू मिळतो आणि कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहणं महत्वाचं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
