महायुतीचा विधानसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार?

लोकसभा निवडणुकीत महायुतीत जागावाटपाचा प्रचंड गोंधळ उडाला व त्याचा फटका महायुतीला बसला होता.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) भाजपचे महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेतून हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. समोर आलेल्या सूत्रांमध्ये चार-पाच जागा मागेपुढे होऊ शकतात, मात्र महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. 

भाजप 150 पेक्षा अधिक जागा लढविणार असून अजित पवार गटाला 60 आणि एकनाथ शिंदे गटाला 70 जागा देण्यात येणार आहेत. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याकडील विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या गटाला सोडल्या जातील. मात्र काही जागा यास अपवादही ठरतील, असेही वृत्त आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीत जागावाटपाचा प्रचंड गोंधळ उडाला व त्याचा फटका महायुतीला बसला होता. यावेळी मात्र, कोणताही गाजावाजा न करता गुप्तपणे महायुतीच्या शीर्षस्थ नेत्यांनी जागावाटपाची बोलणी केल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकएकटे जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विधानसभा जागावाटपाची चर्चा केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेबाबतचा कटु अनुभव भाजपला आलेला आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात अत्यंत सावध असलेल्या भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढविणार असल्याचे शिंदे आणि अजित पवार गटाला 60, तर शिंदे गटाला 70 जागा देणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. 

नक्की वाचा - राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद आणखी वाढणार? जितेंद्र आव्हाड नवा राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत

भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 105 जागा जिंकल्या होत्या. तसेच 10 अपक्ष आमदार भाजपसोबत आहेत. त्यामुळे विद्यमान सर्व जागा भाजप लढणार आहेच. शिवाय, याआधी जिंकलेल्या 35 पेक्षा जास्त जागाही यावेळी लढवण्याचा भाजपचा निर्धार आहे. या 35 जागा महायुतीत सध्या शिंदे गट व अजित पवार गट यापैकी कुणाकडे किती आहेत हे स्पष्ट नाही. मात्र, या 35 जागांवरून वाद होऊ शकतो.

Advertisement

अजित पवारांची 90 वरून 60 वर घसरण...
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा भाजपच्या नेत्यांनी त्यांना विधानसभेच्या 90 जागा देण्याचा शब्द दिला होता. परंतु लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला केवळ एक जागा जिंकता आली. त्यामुळे त्यांना जास्त जागा देऊन जोखीम उठविण्यासाठी भाजपचे नेतृत्व तयार नाही. अजित पवार गटाच्या वाट्याला 60 च्या जवळपास जागा येतील. यात त्यांच्यासोबत आलेले विद्यमान आमदार आणि काही अपक्ष आमदारही आहेत.

शिंदे गटाला 100ची अपेक्षा पण 70 वर बोळवण...
मुख्यमंत्री शिंदे यांनी 100 जागांची मागणी केली होती. पण त्यांच्या वाट्याला 70 च्या जवळपास जागा येतील. शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतल्या जिंकलेल्या जागांचे गणित भाजपच्या नेतृत्वापुढे मांडले. पण यातील बहुतांश जागा तिरंगी लढतीत आलेल्या हे आहेत, असे भाजपचे म्हणणे आहे. तसेच शिंदे यांच्याकडे उमेदवारही नाहीत. त्यामुळे 70 जागांची लक्ष्मणरेखा भाजपने त्यांच्यासाठी आखली आहे

Advertisement