मोहसिन शेख, प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून विनोद पाटील यांनी माघार घेतली आहे. मराठा आरक्षणातील याचिकाकर्ते असलेले पाटील संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. महायुतीकडून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. महायुतीनं शिवसेनेच्या संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिल्यानं पाटील नाराज झाले होते. त्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी दाखवली होती.
विनोद पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत माघार घेण्याची घोषणा केली. आपण कुणाला पाठिंबा न देता, कोणत्या पक्षासोबत न जाता आणि अपक्ष निवडणूक न लढवता तटस्थ राहिले पाहिजे अशी माझी भूमिका आहे, असं पाटील यांनी स्पष्ट केलंय. पाटील यांच्या या घोषणेमुळे भुमरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फडणवीस यांची घेतली होती भेट
विनोद पाटील यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांचीही मला उमेदवारी देण्यात यावी अशी इच्छा होती. महायुतीमधील दोन आमदार आणि एक राज्यसभा सदस्य यांचा माझ्या उमेदवारीला विरोध होता. या निर्णयावर पुनर्विचार होईल अशी मला अजूनही अपेक्षा आहे. मतदार संघाची सध्याची परिस्थिती पाहता माझ्याकडे विजयाचं गणित आहे, असा दावा पाटील यांनी केला होता.
( नक्की वाचा : दिर की भावजय ? अटीतटीच्या लढतीत धाराशिवचा खासदार कोण होणार? )
महायुतीनं उमेदवारी दिली नाही तरी माझ्या ताकदीनं निवडणूक लढवणार असल्याचं पाटील यांनी सोमवारी जाहीर केलं होतं. पण, दोन दिवसांमध्येच त्यांनी या भूमिकेपासून घूमजाव करत निवडणूक न लढवण्याची घोषणा केलीय.
संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे उमेदवार आहेत. त्यांना शिवसेनेच्या संदिपान भूमरे यांचं आव्हान आहे. एमआयएम पक्षाचे नेते आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील देखील रिंगणात आहेत. त्यामुळे संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world