काँग्रेसने अमेठी आणि रायबरेलीतून उमेदवार कोण असणार याबाबतचा सस्पेन्स संपवला आहे. रायबरेलीतून राहुल गांधी मैदानात असणार आहे. तर अमेठीतून के. एल. शर्मा यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. अमेठीतून राहुल गांधी निवडणूक लढतील अशी शक्यता वर्तवली जात होती. तर रायबरेलीतून प्रियांका गांधी असतील असेही म्हटले जात होते. पण हे सर्व अंदाज चुकवत काँग्रेसने सर्वांना चकीत केले आहे. त्यात के. एल. शर्मा यांना अमेठीतून निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. हे के. एल. शर्मा कोण आहेत त्यावर एक नजर टाकूयात.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहेत के. एल. शर्मा?
अमेठीतून काँग्रेसने के.एल. शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर हे के. एल. शर्मा कोण आहेत याची चर्चा सुरू झाली आहे. शर्मा यांचे संपुर्ण नाव किशोरीलाल शर्मा असे आहे. गांधी घराण्याचे अंत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. ते मुळचे पंजाबच्या लुधियानाचे आहेत. 1983 साली ते पहिल्यांदा राजीव गांधी यांच्या बरोबर अमेठी आणि रायबरेलीत आले होते. त्यानंतर ते गांधी घराण्याचे खास झाले. राजीव गांधींच्या हत्येनंतर तर ते गांधी घराण्याच्या आणखी जवळ आहेल. शिवाय त्यांनी अमेठी आणि रायबरेलीत आपला जम बसवला. त्याकाळातही ते राबरेलीत शिला कौल आणि अमेठीत सतिश शर्मा यांची बाजू सांभाळत होते.
हेही वाचा - काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक रिंगणात, तर अमेठीतून...
सोनिया गांधींना दिली साथ
सोनिया गांधी पहिल्यांदा अमेठीतून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या निवडणुकीची सर्व जबाबदारी ही के. एल. शर्मा यांनीच आपल्या खांद्यावर घेतली होती. शिवाय ज्या वेळी सोनिया गांधी यांनी अमेठीची जागा राहुल गांधींसाठी सोडली. त्यानंतर त्या रायबरेलीत आल्या. त्यावेळीही शर्मा यांनी या दोन्ही जागांची जबाबदारी आपल्याकडेच घेतली होती. शर्मा हे बिहारचे प्रभारीही होते. काँग्रेसच्या वर्कींग कमिटीचे सदस्यही होते. पंजाब काँग्रेस कमिटीचेही ते सदस्य होते. काँग्रेसमधून अनेकांनी वेळे नुसार बाहेरचा रस्ता पकडला. पण शर्मा यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबाची साथ कधीही सोडली नाही.
अमेठीत आता स्मृती इराणी यांना आव्हान
एकेकाळी अमेठीच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेणारे के. एल. शर्मा आता स्वत: साठी या मतदार संघात लढणार आहेत. इतकी वर्ष या भागात काम केल्याचे त्यांना सर्व बारकावे माहित आहेत. ही शर्मा यांची जमेची बाजू आहे. त्यांची लढत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या बरोबर होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world