The Folk Aakhyan: 'शाळेच्या आठवणींना पुन्हा उजाळा देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' या सिनेमा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे, टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. याच उत्साहात भर घालत दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या सोशल मीडियावर 'क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी...' अशी एक खास पोस्ट शेअर करत सिनेमाच्या संगीत टीमची घोषणा केली. या पोस्टनंतर आता सिनेमाबाबतची चर्चा अधिकच वाढलीय.
'द फोक आख्यान' पाच गाणी केली संगीतबद्ध
लोककलेला मानाचा मुजरा देणाऱ्या आणि संपूर्ण राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘द फोक आख्यान' या प्रभावी टीमकडे या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवण्यात आलीय. त्यांच्या ठसकेबाज सादरीकरणाने आणि लोककलेला मांडण्याच्या शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे, या सिनेमासाठी त्यांनी खास पाच दमदार गाणी तयार केली आहेत. 'द फोक आख्यान'च्या हर्ष-विजय यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना गीतकार ईश्वर ताराबाई अंधारे यांचे शब्द लाभले आहेत. त्यामुळे आता 'द फोक आख्यान'ची संगीतशैली आणि हेमंत ढोमे यांच्या कथा सांगण्याच्या ताकदीचा संगम पाहाण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.
'द फोक आख्यान'ची का निवड केली?
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला की,"क्रांतिज्योतीसाठी ‘द फोक आख्यान' यांची निवड केली, कारण त्यांची ऊर्जा, लोककलेविषयीची समज, त्यांचे जमिनीशी असलेले नाते या चित्रपटाच्या विषयाला अगदी जुळणारे आहे. या पाच गाण्यांतून मराठी मातीतली ममता व्यक्त होईल. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणात असलेली ताकद, लय आणि प्रामाणिकपणा हा त्यांचा सर्वात मोठा गुण असून आमच्या चित्रपटासाठी आम्हाला अशीच उर्जा आणि असाच ताजा दृष्टिकोन हवा होता."
'द फोक आख्यान' टीमची प्रतिक्रियासंगीतकार हर्ष-विजय म्हणतात,"आमचा क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम हा पहिलाच सिनेमा असून ही आमच्यासाठी खूप मोठी भावना आहे. आम्ही महाराष्ट्राच्या लोककलेत वाढलो, त्याच मातीच्या आवाजात गाणी बनवली आणि आता तीच कला मोठ्या पडद्यावर नेण्याची संधी मिळणं, ही आमच्या आयुष्यातली खास गोष्ट आहे. आम्ही हेमंत ढोमे यांचे खूप आभारी आहोत की, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला ही संधी दिली."
(नक्की वाचा: Madhur Dixit In Politics: माधुरी दीक्षित आता राजकारणाचं मैदान गाजवणार? नेता होण्याबाबत अभिनेत्री म्हणाली...)
सिनेमा कधी होतोय रिलीजयेत्या नवीन वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून ही मराठी शाळा चित्रपटगृहात भरणार आहे. या चित्रपटात मराठी कलाकारांची दमदार फौज झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर या चित्रपटात मुख्यध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. असून अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर या कलाकारांसोबतच मराठी चित्रपटात पहिल्यांदाच प्राजक्ता कोळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
(नक्की वाचा: Samantha Ruth Prabhu Raj Nidimoru: समांथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरूचे नेटवर्थ किती, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?)
हेमंत ढोमे लिखित-दिग्दर्शित क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित, ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' या चित्रपटाचे सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्मस्) आणि अजिंक्य ढमाळ हे आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

