जाहिरात

Silver Prices Crash: चांदीत 'ब्लॅक मंडे', तासाभरात 21,500 रुपयांची घट, सराफा बाजारात नक्की काय झालं?

Silver Prices Crash:  ज्या चांदीने सकाळी नवा इतिहास रचत 2,54,174 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला होता, तीच चांदी अवघ्या 60 मिनिटांच्या आत 21,500 रुपयांनी कोसळली.

Silver Prices Crash: चांदीत 'ब्लॅक मंडे', तासाभरात 21,500 रुपयांची घट, सराफा बाजारात नक्की काय झालं?
मुंबई:

Silver Prices Crash:  सराफा बाजारात आज (सोमवार, 29 डिसेंबर 2026) जे घडलं त्यामुळे मोठ्या गुंतवणुकदारांचे श्वास काही काळ रोखले होते. चांदीच्या किमतीने सोमवारी जो चढ-उतार अनुभवला, तसा प्रकार यापूर्वी कधीच घडला नव्हता. ज्या चांदीने सकाळी नवा इतिहास रचत 2,54,174 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला होता, तीच चांदी अवघ्या 60 मिनिटांच्या आत 21,500 रुपयांनी कोसळली. या अनपेक्षित घसरणीमुळे बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे.

एका तासात बाजार कोसळला

सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर चांदीचा मार्च वायदा भाव जेव्हा 2,54,174 रुपयांवर पोहोचला, तेव्हा सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. वर्ष 2025 चा शेवट चांदीच्या ऐतिहासिक विक्रमाने होईल असे चित्र दिसत होते. 

मात्र, उच्चांकी स्तरावर पोहोचताच अचानक विक्रीचा प्रचंड दबाव वाढला. मोठ्या प्रमाणावर नफावसुली झाल्यामुळे चांदीचे भाव अवघ्या एका तासात धडाम झाले आणि ते थेट 2,32,663 रुपयांपर्यंत खाली आले.

( नक्की वाचा : Gold Silver Rate 2026 : सोने 1.50 लाखांवर जाणार; चांदीचे दर ऐकून तुम्हालाही बसेल मोठा धक्का!)

का झाली घसरण?

बाजार तज्ज्ञांच्या मते या मोठ्या घसरणीमागे तीन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे नफावसुली. चांदीने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर मोठ्या ट्रेडर्सनी आपला नफा सुरक्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विक्री सुरू केली. 

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदल. जागतिक बाजारात चांदीच्या किमती 80 डॉलर्स प्रति औंसवरून घसरून 75 डॉलर्सवर आल्या, ज्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला. तसेच रशिया आणि युक्रेनमधील तणाव काहीसा निवळल्याच्या बातम्या आल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदीतून काही प्रमाणात पैसे काढून घेण्यास सुरुवात केली.

( नक्की वाचा : January 2026 Calendar: मकर संक्रांती ते मौनी अमावस्या; वाचा नववर्षातील पहिल्या महिन्यातील सर्व सण आणि उत्सव )

150 टक्के परतावा आणि भविष्यातील कल

आज जरी चांदीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली असली, तरी गेल्या वर्षभराचा रेकॉर्ड पाहिल्यास या धातूने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. डिसेंबर 2024 मध्ये चांदी साधारण 90,000 रुपयांच्या आसपास होती. तिथून चांदीने तब्बल 150 टक्क्यांहून अधिक मोठी झेप घेतली आहे. 

सध्याच्या काळात सोलर पॅनल, इलेक्ट्रिक गाड्या आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रात चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळेच चांदी ही केवळ एक धातू न राहता सुपर मेटल बनली आहे. आजची घसरण ही बाजार नैसर्गिक रित्या स्थिर होण्याचा एक भाग असल्याचे अनेक विश्लेषकांचे मत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com