मध्यपूर्वेतील इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद आता भारताच्या कानाकोपऱ्यात उमटू लागले आहेत. हे केवळ एक युद्ध नसून, जागतिक पुरवठा साखळीला (Supply Chain) बसलेला असा धक्का आहे. ज्याने सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील गणिते बिघडवली आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि गॅस पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे अनेक उद्योगांची श्वास कोंडला आहे.
बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रावर टांगती तलवार
ऊर्जेच्या किमती वाढल्यामुळे सिमेंट, स्टील आणि टाइल्स बनवणाऱ्या कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. गुजरातच्या मोरबी येथील सिरीमिक युनिट्सचा वेग मंदावला आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांसाठी प्रकल्पाचा खर्च वाढला आहे आणि अनेक प्रकल्पांना विलंब होत आहे. परिणामी, घरबांधणी अधिकाधिक महाग होत आहे आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रावरील दबाव वाढत आहे.यामुळे घरांच्या किमती वाढण्याची शक्यता असून अनेक गृहप्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत.
औषध आणि कंडोम उद्योगावर संकट
भारताचा सुमारे 7,000 ते 8,000 कोटी रुपयांचा कंडोम उद्योग या संकटामुळे प्रभावित झाला आहे. पेट्रोकेमिकल पुरवठा विस्कळीत झाल्याने सिलिकॉन ऑइल आणि अमोनिया या कच्च्या मालाची टंचाई निर्माण झाली आहे. याचा परिणाम भविष्यात कंडोमच्या किमती वाढण्याची किंवा उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Arjun Tendulkar: वडील सचिन तेंडुलकर नाही तर...; हा खेळाडू आहे अर्जुनचा आदर्श)
काच आणि मद्य उद्योगावरही परिणाम
काच उद्योग पूर्णपणे गॅसवर अवलंबून असतो. फिरोझाबादसारख्या काच निर्मिती केंद्रांमध्ये भट्ट्या बंद पडू लागल्या आहेत. यामुळे औषधांच्या बाटल्या, परफ्यूम आणि बिअरच्या बाटल्यांचा तुटवडा जाणवत आहे. बाटल्यांच्या किमतीत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली असून पॅकेजिंगसाठी लागणारे कार्टन, लेबल आणि टेप देखील महागले आहेत.
शेती आणि अन्न प्रक्रिया उद्योगावर परिणाम
युद्धाचा फटका थेट शेतीपर्यंत पोहोचला आहे. खते आणि बियाण्यांचे पॅकेजिंग मटेरियल महागल्याने शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पुरवठा होण्यात अडचणी येत आहेत. बियाणे आणि खतांचा पुरवठा पॅकेजिंग आणि वाहतुकीवर अवलंबून असतो, ज्यावर सध्या परिणाम होत आहे. अनेक कंपन्यांना पॅकेजिंग साहित्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत बियाणे आणि खतांचा वेळेवर पुरवठा होण्यास अडथळा येत आहे. जर ही परिस्थिती दीर्घकाळ टिकून राहिली, तर त्याचा परिणाम उत्पन्नावर आणि पीक चक्रांवर होऊ शकतो.
तसेच, हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये व्यावसायिक LPG महागल्याने खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाली असून ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar News: अजिंठा लेणी पाहायला गेलेल्या पर्यटकांची अचानक पळापळ, 11 पर्यटक जखमी)
विमान प्रवास आणि वाहतूक खर्च वाढला
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधनाचे (ATF) दर कडाडले आहेत. परिणामी, विमान कंपन्यांनी तिकीट दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, समुद्रमार्गे होणारी वाहतूक आणि विमा खर्च वाढल्याने आयात-निर्यात क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.
MSME आणि रोजगार
लहान आणि मध्यम उद्योग (MSME) कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे संकटात आहेत. अनेक युनिट्सनी उत्पादन कमी केले असून, याचा थेट परिणाम रोजगारावर होत आहे. खाडी देशांत काम करणाऱ्या भारतीय कामगारांच्या रोजगारावरही टांगती तलवार असल्याने परदेशातून येणाऱ्या पैशावर परिणाम होऊ शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world